सोलापूर – लोकमंगल फाऊंडेशनतर्फे आयोजित 46 वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आज शिवाजी अध्यापक विद्यालय, नेहरू नगर, सोलापूर येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात 52 वधू-वर जोडप्यांचे विवाह संपन्न झाले. या कार्यक्रमास राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरीभाऊ बागडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी आमदार सुभाष देशमुख, अध्यक्ष रोहन देशमुख, मनीष देशमुख, प्रल्हाद कांबळे, जयवंत थोरात, अनंता चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
मा. राज्यपाल बागडे यांनी आपल्या भाषणात सर्वधर्मीय विवाह सोहळ्याच्या सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकला. “धर्म, जाती, पंथ यांच्या पलीकडे जाऊन प्रेम, समता आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा जपणारा हा उपक्रम आहे,” असे ते म्हणाले. आमदार सुभाष देशमुख यांनी गेली वीस वर्षे सातत्याने हा उपक्रम राबवून 3205 जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या पार पाडले आहेत, याची त्यांनी प्रशंसा केली.
राज्यपालांनी अन्नपूर्णा योजनेचेही कौतुक करत साध्या पद्धतीने विवाह करण्याचे आवाहन केले. “विवाहात वायफळ खर्च टाळून समाजात आदर्श निर्माण करावा,” असे त्यांनी सांगितले. सामुदायिक विवाहानंतर नवदांपत्यांना रोजगार, व्यवसायासाठी कर्जसह विविध मदतीचे उपक्रम आमदार देशमुख राबवतात, याचीही त्यांनी नोंद घेतली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांनी मा. राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिल्याबद्दल आभार मानले.


















