परतूर / जालना – संतांचे विचार म्हणजे जीवनाला दिशा दाखवणारी दीपशिखा आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या उद्धारासाठी संतांची शिकवण आणि संतांची संगती हीच खरी मूल्यवान ठेवा आहे. आजच्या काळात भौतिक प्रगती होत असली तरी मानवी मूल्ये, सहिष्णुता, आणि सद्भावना कमी होताना दिसतात. संतसाहित्य आणि संतांच्या विचारातून आपण शांतता, प्रेम, आणि समतेचे धडे घेऊ शकतो. संत सहवासातून मनाची शुद्धी आणि बुद्धीची जागृती करणारा अनुभव मिळतो. प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी संत संगती आणि शिकवण महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी केले.
नांगरतास येथे दरवर्षीप्रमाणे महंत रामगिरी बाबा यांचा 47 वा पुण्यतिथी सोहळा आयोजित केला जातो. या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी राहुल लोणीकर बोलत होते. यावेळी लोणीकर यांनी आपल्या भाषणात समाजाच्या कल्याणासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी, आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी संतांची शिकवण व त्यांची संगत उपयुक्त असल्याचे स्पष्ट केले. जिथे संतांची कृपा असते, तिथे जीवनातील अडथळे दूर होतात. संतांचे आशीर्वाद हीच खरी शक्ती आहे असेही राहुल लोणीकर यावेळी म्हणाले. प्रसंगी महंत भागवतगिरीजी महाराज महंत बालकगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
केवळ संतांच्या नावाचा जप न करता त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा, ते आचरणात आणावे, आणि पुढच्या पिढीला देखील हा वारसा द्यावा. संत विचार अंगीकारले, आचरणात आणले तरच जीवनातील खरी प्रगती साध्य होईल. संत हे समाजातील शांततेचे, नीतिमत्तेचे आणि सद्भावनेचे प्रवर्तक आहेत. त्यांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांनी दिलेल्या संदेशावर चालणे हेच त्यांच्या कार्याचा खरा सन्मान आहे.
आपण संतांचे चरित्र वाचतो, त्यांचे नामस्मरण करतो, पण त्यांच्या तत्त्वांचा अवलंब केल्याशिवाय त्याचा समाजावर परिणाम दिसणार नाही. संतांनी मार्गदर्शित केलेल्या ‘प्रेम, करुणा, आणि सेवा’ या तत्त्वांवर चालताना, सामाजिक ऐक्य आणि शांतता आपोआप निर्माण होते. संतांच्या शिकवणींमध्ये असलेला “सर्वांमध्ये एकता आणि समरसता” हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे राहुल लोणीकर यावेळी म्हणाले.
संतांच्या शिकवणुकीत सामाजिक ऐक्य हे मूळ सूत्र असून तेच आजच्या समाजाच्या विकासाचे आणि शांततेचे आधार आहे. आपापसातील भेदभाव बाजूला ठेवून संतांच्या मार्गाने आपण प्रेम आणि सेवा यांची भावना जागवली पाहिजे. आजच्या काळात समाजाला एकत्र ठेवणारी नैतिकता आणि बंधुभावाची आवश्यकता निर्माण झाली आहे.
संतांनी नेहमीच समाजात समानतेचा आदर्श निर्माण करून जनतेला एकत्र करण्याचा नेहमीच प्रयत्न केला असून संतांचे संदेश हे केवळ आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचेही मार्गदर्शक आहेत, असे देखील राहुल लोणीकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ दत्तात्रय काकडे शिवाजीराव जाधव आनंद जाधव मोहन आढे डॉ राठोड माऊली तनपुरे रामेश्वर चव्हाण बाळासाहेब चव्हाण मनोज देशमुख विलास घोडके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


















