पंढरपूर – पंढरपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण भाजपाकडून सोमवारी अखरेच्या दिवशी शामल शिरसट (पापरकर) यांनी तर आमदार अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन आघाडीकडून सारिका साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान विठ्ठल परिवाराच्या तिर्थक्षेत्र विकास आघाडी कडून डाँ.प्रणिता भालके यांनी या अगोदरच नगराध्यक्षपदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज दाखल करुन हम भी किसीसे कम नही है दाखवुन दिले आहे.
नगरपालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (ता.१७ नोव्हेंबर ) शेवटचा दिवस होता. त्यामुळे येथील नगरपालिका कार्यालयात सकाळी दहा वाजल्या पासूनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी झालेली होती. भाजपा आणि पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या माध्यमातून परिचारक गट यंदाच्या नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असताना देखील परिचारक गटाने महिला सर्वसाधारण जागेवर ऐनवेळी ओबीसी कार्ड खेळत शामल शिरसट (पापरकर) या आपल्या उमेदवाराला कमळाच्या चिन्हावर भाजपाकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यांच्या विरोधात येथील विठ्ठल कारखान्याचे चेअरमन तथा माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या विठ्ठल परिवर्तन आघाडीकडून सारिका साबळे यांना उमेदवारी देवू केली आहे.सारिका साबळे यांनी यापूर्वी नगरसेविका म्हणून पालिकेत काम केलेले आहे. येथील नगरपालिकेच्या कार्यालयात येवून सारिका साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर माजी आमदार (कै.) भारत भालके यांच्या स्नुषा तथा विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके यांच्या पत्नी डाँ.प्रणिता भालके यांनी विठ्ठल परिवाराच्या तिर्थक्षेत्र विकास आघाडीकडून या अगोदरच नगराध्यक्षपदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान माजी नगराध्यक्षा साधना भोसले या देखील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होत्या. त्यांचे पती तथा माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी परिचारक यांच्या विरोधात विठ्ठल परिवाराला एकत्र करण्यात मोलाची भूमिका निभावली होती. मात्र विठ्ठल परिवारातून नगराध्यक्षपदासाठी साधना भोसले यांच्या नावा ऐवजी भगिरथ भालके यांच्या पत्नी डाँ.प्रणिता भालके यांचे नाव पुढे आल्यामुळे नागशे भोसले यांनी विठ्ठल परिवारातून बाहेर पडत भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळते का ? यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या नावाला परिचारकांचा प्रखर विरोध असताना देखील आमदार समाधान आवताडे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत नागेश भोसले यांनी प्रयत्न केले होते. मात्र भाजपाकडून उमेदवारी मिळविण्यात अखेर त्यांना अपयश आले. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून आपल्या पत्नी साधना भोसले यांचे नाव मागे घेत स्वत: नगरसेवकपदासाठी विठ्ठल परिवाराच्या तिर्थक्षेत्र विकास आघाडी मार्फत निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची त्यांनी तयारी दर्शविली. त्यामुळे नगरसेवकपदासाठी आपला उमेदवारी अर्ज देखील भोसले यांनी अखरेच्या क्षणी दाखल केला आहे.
या बरोबरच परिचारकांकडून सुरुवाती पासूनच नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या वैशाली वाळुजकर यांचे देखील नाव ऐनवेळी मागे पडले. परिचारकांनी अखरेचा डाव टाकीत शेवटच्या टप्प्यात ओबीसी कार्ड बाहेर काढून नगराध्यक्षपदासाठी आपले विश्वसनीय शिलेदार माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी शामल लक्ष्मण शिरसट (पापरकर) यांना उमेदवारी देवू केली. जोरदार शक्तीप्रदर्शन करीत शामल शिरसट यांनी येथील नगरपालिकेच्या कार्यालयात येवून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीतील नावाचा निर्माण झालेला सस्पेन्स संपून नगराध्यक्षपदाची निवडणूक आता तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
——————-
फोटो मेसेज : बातमी सोबत वापरण्यासाठी शामल शिरसट आणि सारिका साबळे यांचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे फार्म दाखल करतानाची छायाचित्रे पाठवित आहे. या बरोबरच नगराध्यक्षपदाच्या तिसऱ्या उमेदवार डाँ.प्रणिता भालके यांचा आयडेटींसाईचा फोटो माहितीस्तव पाठवित आहे. कृपया दोन्ही फोटो बरोबर भालके यांचा देखील फोटो वापरावा ही नम्र विनंती.


















