सोलापूर : सोलापूर महापालिका प्रशासनाकडून सोमवारी राबवण्यात आलेली महापालिका प्रभाग आरक्षण प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने झाली, असा आक्षेप भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी घेतला.
सोमवारी हुतात्मा स्मृती मंदिरात सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा सुधारित प्रभाग आरक्षण प्रक्रिया घेण्यात आली. ही प्रक्रिया सुरू असतानाच त्यास आक्षेप घेताना नरेंद्र काळे यांनी म्हटले की, महापालिका निवडणुकीसाठी सुधारित आरक्षण प्रक्रिया करण्यात आली. ही प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे न झाल्याने कुठेतरी गडबड झाली आहे. प्रभाग क्रमांक 24 संदर्भात याचे उदाहरण देता येईल. वास्तविक ही प्रक्रिया राबवताना राज्य निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी या ठिकाणी असणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी प्रतिनिधी नसताना ही प्रक्रिया केलीच कशी? असा सवाल नरेंद्र काळे यांनी केला. यापूर्वीच्या निवडणुकीत ओबीसीच्या 28 जागा होत्या, यंदा त्या 27 झाल्याने एक जागा कमी झाली आहे. ही बाब ओबीसी घटकावर अन्यायकारक आहे, असेही ते म्हणाले.
राज्य निवडणूक आयोगाच्या
निर्देशाप्रमाणेच प्रक्रिया : डॉ. ओंबासे
नरेंद्र काळे यांनी आरक्षण सोडत वेळी घेतलेल्या आक्षेपावर तिथेच खुलासा करताना महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की, आरक्षण सोडत प्रक्रिया ही राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच होत आहे. याबाबत कोणाची काही हरकत, सूचना असेल तर ती दि. 19 ते 26 नोव्हेंबर या मुदतीमध्ये अधिकृतपणे नोंदवावी. हा कार्यक्रम नियोजित आहे.
प्रभाग क्रमांक १५ मध्ये घोळ झाल्याची हरकत
आरक्षण सोडती दरम्यान प्रभाग क्रमांक १५ मध्ये घोळ झाल्याची हरकत किरण पवार यांनी घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार एका प्रभागात दोन महिलांना आरक्षण देता येत नाही. प्रत्येक प्रभागात नियमानुसार एक सर्वसाधारण महिला अपेक्षित आहे. या प्रभागात एस. सी. महिला आणि ओबीसी महिला असे दोन जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. या पद्धतीवर आक्षेप असल्याचे सांगितले आणि अन्य एकाने याच प्रभागातील ओबीसी पुरुषावर या पद्धतीने अन्याय झाल्याची हरकत घेतली मात्र ठरल्या कार्यक्रमानुसार लेखी स्वरूपात हरकती घ्याव्यात असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केल्याचे दिसून आले.


















