सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून पुन्हा आरक्षण सोडत आज काढण्यात आली. दि. ११ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये बदल झाल्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोमवारी महापालिका प्रशासनाने आरक्षण सोडत काही प्रभागासाठी काढली. यामध्ये महापालिकेच्या सहा प्रभागातील बारा जागांवर नव्या आरक्षण सोडतीमुळे फेरबदल झाले आहेत. याचा काहींना फटका बसणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या नियंत्रणाखाली ही फेर आरक्षण सोडत आपणास स्मृती मंदिरात सकाळी १०.३० घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, नगररचना उपसंचालक मनीष भीष्णुरकर, निवडणूक अधिकारी प्रदीप निकते, सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर, मालमत्ता विभाग अधीक्षक युवराज गाडेकर, सहाय्यक अभियंता महेश क्षीरसागर, निवडणूक कार्यालय अधीक्षक ओमप्रकाश वाघमारे यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते. यासाठी लिपिक गणेश कोळी , रहमान मोगल, मतीन सय्यद यांचे सहकार्य लाभले. मनपा शाळा क्रमांक सहा मधील विद्यार्थी अरहान बागवान (इयत्ता पाचवी) आणि मन्सूर बागवान (इयत्ता पाचवी) यांनी आरक्षण सोडत चिठ्ठी काढली. त्यांच्या समवेत सहशिक्षक मिलिंद खंदारे उपस्थित होते.
दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी काढलेल्या आरक्षण सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगास मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. या सोडतीच्या निकालामध्ये आणि इतिवृत्त याच्या तपासणीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील (ओबीसी) महिलांचे आरक्षण निश्चित करताना नियम क्र. ६ (३) (ब) नुसार प्रभाग क्रमांक २४- क येथील ओबीसी जागा थेट ओबीसी महिलांसाठी आरक्षित करणे आवश्यक होते. मात्र आरक्षण सोडतीत तसे न होता त्यामध्ये चूक झाली होती. यामुळे आता ही जागा थेट ओबीसी महिलांसाठी आरक्षित करावी आणि प्रभाग- २४- ड ही जागा सर्वसाधारण महिलांऐवजी सर्वसाधारण करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते.
याबरोबरच ओबीसी महिलांच्या आरक्षण सोडतीसाठी केवळ अ जागेवरील प्रभागांचा समावेश केला गेला होता. मात्र ब जागांवरील अनुज्ञेय प्रभागांचा समावेश केला नसल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या ठरल्या नियमामध्ये बदल झाला होता. यामुळे उर्वरित ५ जागांची सोडत अनुज्ञेय प्रभाग क्रमांक-३, ४, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १५, १७, १८, २०, २१ आणि २५ अशा १६ प्रभागांमधील जागांचा समावेश करून ओबीसी प्रवर्गातील महिलांच्या ५ जागांची सोडत काढण्याची कार्यवाही शासनाने दि. २० मे २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या नियमातील तरतुदीनुसार करावी. तसेच सर्वसाधारण महिलांच्या जागा देखील नियम ६ (४) नुसार नेमून देण्यात याव्यात ही कार्यवाही दिलेल्या प्रपत्र मधील कार्यक्रमानुसार करावी आणि सोडतीनंतर त्याचा निकाल तात्काळ राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात यावा असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांनी यांनी सोलापूर महापालिका प्रशासनासह अन्य ८ महापालिकांना पाठविले होते.
यानुसार सोमवारी महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी अपेक्षित आरक्षण सोडत काढली. नव्या फेर आरक्षण सोडतीमध्ये मात्र राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाला एक जागा कमी दिल्यामध्ये कोणतीही बदल केली नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्गासाठीची ती एक जागा तशीच कमी राहिली आहे. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने थेट २५ जागा नेमून दिल्या होत्या आणि २ सोडतीने निश्चित झाल्या होत्या अशा २७ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) निश्चित केल्या यामधून महिलांसाठीच्या १४ जागा थेट किंवा सोडतीने यथास्थिती परिस्थितीनुसार काढण्याचे निर्देश दिले होते. या सोडतीमध्ये ५ जागा ओबीसी महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या.
सोमवारी घेण्यात आलेल्या फेर सोडतीमध्ये आयोगाच्या निर्देशानुसार त्या १६ प्रभागांमधून पाच जागा सोडतीने निश्चित करण्यात आल्या. या फेरबदल्यामुळे काही प्रभागांमधील विद्यमान माजी नगरसेवकांना फटका बसला आहे तर काही जवळपास इतर प्रभागांमध्ये अदलाबदल झाले आहेत. यामुळे अनेकांपुढे ‘सर्वसाधारण’ चा मार्ग शोधावा लागणार आहे.
चौकट
फेर आरक्षणात झालेले बदल असे…
* प्रभाग १० अ- मधील ओबीसी ऐवजी महिला ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित
* १० क- मधील सर्वसाधारण महिला ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित
* १३ ब- मधील ओबीसी ऐवजी महिला ओबीसी प्रवर्गासाठी प्रवर्गासाठी आरक्षित
* १३ क- मधील सर्वसाधारण महिला ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित
* १५ ब- मधील ओबीसी ऐवजी ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित
* १५क- मधील सर्वसाधारण महिला ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित
* प्रभाग १८ अ- मधील ओबीसी ऐवजी ओबीसी महिलांसाठी आरक्षित
* १८ क- मधील सर्वसाधारण महिला ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित
* प्रभाग २० अ- मधील ओबीसी ऐवजी ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित
* प्रभाग २० क- मधील सर्वसाधारण महिला ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित
* प्रभाग २४ क- मधील ओबीसी ऐवजी ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित
* प्रभाग २४ ड- मधील सर्वसाधारण महिला ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित.
—-


















