मंगळवेढा – मंगळवेढा शहरात अल्पवयीन वधूचा होणारा बालविवाह सोलापूर बाल संरक्षण कक्ष व पोलीस प्रशासन यांच्या सतर्कतेमुळे टळला आहे. दरम्यान व्हॉटसअप,फेसबुकच्या जमान्यातही बालविवाह होत असल्याने सुज्ञ नागरिकामधून चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेची हकीकत अशी,सोलापूर येथील बाल संरक्षण कक्षचे मल्लीनाथ तमशेट्टी यांना मंगळवेढ्यातून एका अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन तक्रार करुन येथे बालविवाह दि.15 नोव्हेंबर रोजी 12.40 वाजता होणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार तेथील अधिकारी मल्लीनाथ तमशेट्टी मंगळवेढा पोलीस स्टेशनला हजर होवून पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्याशी बालविवाह होणार असलेबाबत चर्चा केली.
पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर,महिला पोलीस हवालदार वंदना अहिरे, सुरेश कांबळे,पोलीस अंमलदार श्रीकांत देवकते,बालविकास विभागाच्या अस्मिता पठाण यांचे पथक रजपूत मंगल कार्यालय येथे दाखल झाले. यावेळी या पथकाला मोहोळ येथील 15 वर्षीय 10 महिन्याची वधू व कचरेवाडी येथील 23 वर्षीय वर यांची लगीनघाई सुरु असल्याचे निदर्शनास आले.
या पथकाने वधू व वरास ताब्यात घेवून मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये हजर करुन त्यांचे समुपदेशन करुन वधूस आई वडिलाच्या ताब्यात देण्यात आले. सध्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण होवून विज्ञानाकडे प्रगती करीत असताना व्हॉटसअप, फेसबुकच्या जमान्यातही मंगळवेढ्यात बालविवाह होत असल्याचे समजताच सुज्ञ नागरिकामधून याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.


















