मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि बीड अमेच्युअर खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली ६१ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा १८ ते २१ डिसेंबर दरम्यान बीडमध्ये रंगणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस व नवनिर्वाचित महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहयोगी उपाध्यक्ष डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिली.
राज्यातील सर्वोत्तम खेळाडूंचा खो-खो कौशल्यदंगल श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बीड येथे पार पडणार आहे. बीड येथे होणाऱ्या या महत्त्वाच्या राज्य स्पर्धेतून ५८ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे. निवडलेला संघ हैद्राबाद, तेलंगणा येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
खो-खो महासंघाकडे नोंदणी केलेले खेळाडूच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज नमुना व गणवेश क्रमांकानुसार यादीचे नमुने १ डिसेंबर २०२५ पासून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. राज्य संघटनेकडून देण्यात आलेल्या निर्धारित फॉर्ममध्ये माहिती भरून १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत maharashtrakhokhoassociation@gmail.com या मेलवर पाठवणे बंधनकारक आहे. हाताने लिहिलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
या स्पर्धेमुळे बीडच्या क्रीडा संस्कृतीला नवा जोश आणि वेग मिळणार असून, राज्यभरातील अव्वल खेळाडूंमध्ये रोमांचक लढती पाहायला मिळणार असल्याचे सरचिटणीस डॉ. जाधव यांनी सांगितले.


















