मंगळवेढा – कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. येथे मंगळवार 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूरयांचे वायुवेग पथक मंगळवेढा यांच्यावतीने रस्ते सुरक्षा अभियान संपन्न झाले. त्यावेळी बोलताना कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक म्हणाले की महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नुकताच सुरु झाला आहे. “रस्ते सुरक्षा अभियान” हे रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांविषयी जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी राबवले जाणारे एक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अभियान आहे. या अभियानांतर्गत वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन आणि कारखाना प्रशासन एकत्र काम करतात. याचा मुख्य उद्देश वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हा आहे.
मंगळवेढा वायुवेग पथकाचे प्रमुख मोटार वाहन निरिक्षक गणेश मोहनराव तपकीरे यांनी रस्ते अपघाताविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहाय्यक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे व असिफ मुलाणी यांचे मार्गदर्शनाखाली वायुवेग पथक स्थापन केले आहे असे सांगीतले. पुढे बोलताना त्यांनी अपघात टाळणेसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने ऊस वाहतुकीचे वाहनावर पाठीमागे नमुन्यातील चार बाय चार फुटाचे रिफ्लेक्टर बोर्ड लावावेत. सदर रिफ्लेक्टर ऊसाने किंवा पाचटाने झाकलेले नसावेत, वाहनात भरलेल्या ऊसाची उंची योग्य असावी अधिक भरलेल्या ऊसामुळे वाहन पलटी होण्याचा धोका अधिक असतो. ओव्हरलोड वाहतुक करु नये, ऊसाने भरलेली वाहने पुढे नेण्यासाठी स्पर्धा करु नये. आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने, निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवु नये. चालकाकडे योग्य ते लायसन्स असणे गरजेचे आहे. भरलेल्या किंवा रिकाम्या वाहनाला दोनपेक्षा जास्त टेलर जोडु नये. शहरातील मुख्य रस्त्याचा वापर न करता बाह्यवळण रस्ताचा वापर करावा. रात्रीचे वेळी पाठीमागील बाजुस लाल रंगाचा टेल लँप दिवा लावावा. टेलरला दोन्ही बाजुस लाल, पिवळा व पांढऱ्या रंगाचे रिफ्लेक्टर टेप लावावेत जेणेकरुन वाहन वळण घेत असताना पुढील किंवा मागील वाहनास सुचना मिळेल. अशा मार्गदर्शक सुचना दिल्या. तसेच रस्ते वाहतुकीचे नियमही सर्व उपस्थित वाहन चालकांना समजावुन सांगितले.
सदर प्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे, चिफ फायनान्सियल ऑफीसर दिनेश खांडेकर, ई.डी.पी मॅनेजर अभिजीत यादव, केनयार्ड सुपरवायझर श्रीकांत गणपाटील, सुरक्षा अधिकारी सिकंदर सय्यद मोटार वाहन निरिक्षक गणेश मोहनराव तपकीरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियांका मारुती माने व पूनम हरिश्चंद्र चव्हाण तसेच तोडणी-वाहतुक ठेकेदार यांचे हस्ते ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावणेत आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे व आभार ई.डी.पी मॅनेजर अभिजीत यादव यांनी मानले.
फोटो ओळी:- युटोपियन शुगर्स लि. येथे रस्ते सुरक्षा अभियानकार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे, ई.डी.पी मॅनेजर अभिजीत यादव, केनयार्ड सुपरवायझर श्रीकांत गणपाटील, सुरक्षा अधिकारी सिकंदर सय्यद मोटार वाहन निरिक्षक गणेश मोहनराव तपकीरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियांका मारुती माने व पूनम हरिश्चंद्र चव्हाण तसेच तोडणी-वाहतुक ठेकेदार.


















