जालना – बालगृहातील मुलांना सुरक्षित, सुसंस्कृत आणि सक्षम भविष्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शिक्षणासह सर्व आवश्यक सोयीसुविधा त्यांना उपलब्ध करून द्याव्यात,” असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आज दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना शहरातील पंचायत समिती जवळ असलेल्या शासकीय मुलांचे बालगृह तथा निरीक्षण गृहास भेट दिली. यावेळी बालगृह तथा निरीक्षण गृहाचे अधिक्षक धनाजी खुपकर यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बालगृहांची पाहणी करताना त्यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पोषण, तांत्रिक सुविधा आणि मानसिक सक्षमीकरणाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. प्रत्येक बालकाला दर्जेदार शिक्षण मिळावे,तसेच येथील मुलांना वाचन-साहित्य, संगणक शिक्षण, क्रीडा साहित्य आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच मुलांच्या आरोग्य तपासण्या नियमितपणे व्हाव्यात, पोषण आहारात कोणतीही तडजोड होऊ नये, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत असावी याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. बालगृहातील मुलांसाठी समुपदेशन, कौशल्य विकास आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर त्यांनी भर द्यावा, बालगृह तथा निरीक्षण गृहाचे सुरू असलेले बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे सदरील बांधकामाचा दर्जा चांगला असावा असे निर्देश त्यांनी दिले.
सदरील बालगृहात 14 व निरीक्षण गृहात 1 असे एकूण 15 विद्यार्थी आहेत. यावेळी येथील मुलांनी जिल्हाधिकारी यांना गीत गाऊन दाखवले तसेच जिल्हाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.




















