सोलापूर – तीर्थक्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा देवाची यात्रा मार्गशिर्ष शुध्द चंपाषष्टी बुधवार दि.२६ नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने मंदिर समितीच्या वतीने सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती श्री खंडोबा मंदिर बाळे, देवस्थान ट्रस्टीचे चेअरमन विनय ढेपे यांनी दिली.
दरम्यान, यात्रेचे प्रमुख तीन रविवार दि.३० नोव्हेंबर, दि.०७डिसेंबर, आणि दि.१४ डिसेंबर असे एकूण चार दिवस खंडोबा देवाची यात्रा भरते व यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र या तीन राज्यातून दर्शनासाठी येत असतात.तसेच रात्री ठिक ८.०० वा. श्री. खंडोबा देवाची पालखी व विद्युत रोशनाईने सजविलेले सोलापूरात आलेले मानाचे नंदिध्वज यांची मिरवणूक पाहण्याकरीता भरपूर लोकांची गर्दी होत असते.
यात्रा कालावधीत श्री ची पहाटे ५.०० वाजता काकड आरती व सकाळी ठिक ८.०० वा. व रात्री ७.०० वा. दोन वेळा महापूजा अभिषेक करण्यात येते. तसेच दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्यामुरळी नाचणे, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ काढणे अशा विविध धार्मिक विधीचे कार्यक्रम होत असतात.
चौकट
देवस्थान समितीच्या वतीने योग्य नियोजन
भाविक यात्रेकरूंच्या दर्शनाच्या सोयीसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेकडून सिटी बस सेवा व पाण्याची सोय केली आहे. देवस्थान ट्रस्टीचे चेअरमन विनय विजय ढेपे, सचिव सागर चंद्रकांत पुजारी, उपाध्यक्ष सुरेश पांडूरंग पुजारी, सदस्य आदिनाथ मल्हारी पुजारी, सदस्य कल्लेश्वर रमेश पुजारी व समस्त पुजारी मंडळी यात्रा कालावधीत भाविक यात्रेकरूंच्या दर्शनांच्या व विविध विधीच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण दिवसभर सहभागी होऊन यात्रेचे नियोजन करत आहेत. तसेच पौष शु. षष्टी बांगरषष्ठी वार शुक्रवार दि.२६ डिसेंबर २०२५ रोजी महाप्रसाद वाटप करून सर्व पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे व गावडे आदीं मानकरी व भाविक यात्रेकरू यांना प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता होणार आहे.
– विनय ढेपे, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन




















