किनवट – जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, विशेषत: अनुसूचित जाती अनु. जाती राखीव असलेल्या गणात एका महत्त्वाकांक्षी उमेदवाराने आपली निवडणूक लढवण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्ष कडून संधी मिळाल्यास आपण ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचा निर्धार अंकुश भालेराव यांनी व्यक्त केला आहे.
भाजपच्या धोरणांवर विश्वास या संदर्भात बोलताना अंकुश भालेराव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारने समाजातील वंचित घटकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मला जर पक्षाने गोकुंदा पंचायत समितीच्या अनु. जाती राखीव गणातून प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली, तर मी १००% योगदान देईन.”
स्थानिक विकासाचा अजेंडा अंकुश भालेराव यांनी यावेळी आपला अजेंडाही स्पष्ट केला. ते म्हणाले, “या गणातील पाणी समस्या, रस्ते विकास, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा सुधारण्यावर माझा प्रामुख्याने भर असेल. निवडून आल्यास, स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भाजपच्या विकासाच्या धोरणांना गावात रुजवण्यासाठी मी कटिबद्ध असेन.”
पक्षाच्या निर्णयाकडे लक्ष सध्या अंकुश भालेराव यांचा हा निर्धार भाजपच्या स्थानिक नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. गोकुंदा गणातून पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी इतरही इच्छुक असले तरी, अंकुश भालेराव यांनी व्यक्त केलेला आत्मविश्वास पाहता, आता पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व कोणाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यांच्या या घोषणेमुळे गोकुंदा पंचायत समितीच्या अनु. जाती राखीव गणातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


















