मोडनिंब – सोलापूर पुणे महामार्गावर माढा तालुक्यातील मोडनिंब ही व्यापार पेठ तसेच मोठी बाजारपेठ असून या ठिकाणाहून पंढरपूर, कोल्हापूरला नागरिकांना देवदर्शनासाठी जाण्याची सोय होईल. मोडनिंब (ता. माढा) येथे रेल्वे स्थानकात कलबुर्गी-कोल्हापूर, दादर सातारा, धनबाद कोल्हापूर, या विशेष रेल्वे गाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी मोडनिंब व परिसरातील प्रवाशांतून होत आहे. विशेष रेल्वे गाड्यांपैकी काही रेल्वे गाड्या मोडनिंब पेक्षा लहान असणाऱ्या ठिकाणी थांबतात. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.आत्तापर्यंत मोडनिंब (ता. माढा) येथील ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी, नागरिकांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. सह्यांची मोहीम राबविण्यात आली. समक्ष भेटून निवेदने देण्यात आली. मात्र उपयोग झाला नाही. तसेच मोडनिंब येथून कुडूवाडी रेल्वे जंक्शनला जाण्याची नागरिकांची सोय होईल तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येणे जाणे सोयीस्कर होईल.दादर सातारा ही विशेष रेल्वे आठवड्यातील तीन दिवस मोडनिंब स्थानकावरून ये जा करते.
धनबाद-कोल्हापूर ही आठवड्यातून एकदा मोडनिंब स्थानकावरून धावते. ही विशेष रेल्वे धनबादहून निघाल्यानंतर बुधवारी मोडनिंब येथून पुढे मार्गस्थ होते. कोल्हापूरहून धनबादकडे जाताना शुक्रवारी मोडनिंब येथून पुढे जाते.
कलबुर्गी-कोल्हापूर ही विशेष रेल्वे दररोज मोडनिंब रेल्वे स्थानकावरून पुढे धावते. या तिन्ही विशेष रेल्वे गाड्यांना मोडनिंब थांबा मिळाल्यास मोडनिंब परिसरातील हजारो नागरिकांची सोय होणार आहे.मोडनिंब रेल्वेस्थानकावर कुर्डूवाडी कडे जाताना डाव्या बाजूला असणाऱ्या जुन्या प्लॅटफॉर्मची उंची वाढण्यात आली आहे. उजव्या बाजूला प्लॅटफॉर्म तयार करणे गरजेचे आहे. मिरज कुर्डूवाडी डेमो गाडी दररोज आहे. कुर्डूवाडीला जाण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता तर कुर्डूवाडीहून मिरजला जाण्यासाठी सकाळी सव्वा अकरा वाजता ही डेमो गाडी मोडनिंब स्थानकावर येते. परळी सांगली दररोज साधारण दीड वाजता मोडनिंब ला येते. सांगलीहून परळीला जाताना ही रेल्वे गाडी रात्री साडे अकराच्या सुमारास मोडनिंब स्थानकावर येते. निजामाबाद पंढरपुर मोडनिंबला दररोज रात्री साडेतीन वाजता पोहोचते तर पंढरपूरहून निजामबादकडे जाताना मोडनिंबला सकाळी पावणेसहाला पोहोचते. सध्या या तीन रेल्वे गाड्या मोडनिंब रेल्वे स्थानकात थांबत आहेत.
मागील काही महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध राजकीय व सामाजिक संघटना, तसेच स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदने दिली. सह्या मोहिमा राबविण्यात आल्या, प्रत्यक्ष भेटीद्वारे मागणी करण्यात आली, मात्र अद्यापापर्यंत कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही.
शिक्षण, व्यापार यासारख्या सर्व गोष्टींचा मोडनिंब हा मध्यबिंदू आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांचे थांबे मिळाल्यास हजारो नागरिकांचा प्रवास सुलभ होईल. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक, शेतकरी, व्यापारी यांची सातत्याने मागणी करत आहे या सर्व बाबींचा विचार करून तातडीनने उपाययोजना कराव्यात.
– कैलास तोडकरी, माजी सरपंच
मोडनिंब ही परिसरातील मोठी बाजारपेठ आहे.मोडनिंबसारख्या महत्त्वाच्या ठिकाणाला विशेष गाड्यांचे थांबे मिळत नाहीत,त्यामुळे परिसरातील लोकांना कुर्डुवाडी,सोलापूर,दौंड सारखे पर्याय शोधावे लागतात ही सामान्य लोकांची मोठी अडचण आहे.रेल्वे गाड्या मोडनिंबला थांबल्या तर वेळ वाचेल आणि सुरक्षित प्रवासही होईल.
– राहुल गांधी, भाजपा शहराध्यक्ष
मोडनिंब (ता. माढा) येथील रेल्वे स्थानकावर कलबुर्गी–कोल्हापूर, दादर–सातारा, धनबाद–कोल्हापूर या विशेष गाड्यांना थांबा मिळावा, अशी जोरदार मागणी स्थानिक प्रवाशांकडून होत आहे. विशेष बाब म्हणजे, या तिन्ही गाड्या मोडनिंबपेक्षा लहान असणाऱ्या काही स्थानकांवर थांबत आहेत. त्यामुळे मोडनिंब परिसरातील नागरिकांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.



















