परतुर / जालना – सीबीएसई दिल्ली आयोजित ‘स्टेम फोर विकसित अँड आत्मनिर्भर भारत’ या प्रतिष्ठित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत परतुर येथील विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने मोठे यश संपादन केले आहे.
पुणे येथे दि १४ व १५ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ४८८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातून विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या एका टीमने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावत, आपली क्षमता सिद्ध केली असून, त्यांची निवड आता राष्ट्रीय स्तरावर झाली आहे!
विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या नवव्या (९ व्या) वर्गातील दोन टीम्स या प्रदर्शनीत सहभागी झाल्या होत्या. पहिल्या टीमने आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींपूर्वी लोकांना सूचना, सावधानतेचा इशारा देणारा रोबोट बनवला होता, तर दुसऱ्या टीमने स्मार्ट ॲग्रीकल्चर रोबोटिक्स’च्या मदतीने शेती कशी करावी, याचा उत्कृष्ट प्रयोग बनवला होता.
‘स्मार्ट ॲग्रीकल्चर रोबोटिक्स’ हा प्रयोग प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून, तो शाळेतील विद्यार्थी प्रथमेश झंवर आणि विराज झोरे यांनी तयार केला आहे. या विद्यार्थ्यांनी दोन बाय तीन फूट आकाराच्या प्लायवुडवर शेताचा आकर्षक देखावा तयार करून त्यावर हवामानाचा अहवाल देणारे, जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्यावर संकेत देणारे, पाऊस आल्यावर धान्य झाकून ठेवणारे, पाखरे-माकडे इतर जनावरे यांना पळवणे तसेच शेतकऱ्याला तसा संकेत देणारे आणि पाण्याची टाकी भरल्यावर संकेत देणारे अशी विविध रोबोटिक्स यंत्रे लावून एक मोठे मॉडेल बनवले होते. असे तंत्र विकसित झाल्यास शेतकऱ्यांना शेती करण्यास खूप मोठा फायदा होईल व शाश्वत शेती शेतकरी करेल, असे या प्रयोगाचे महत्त्व आहे.
हा मोठा मॉडेल बनविण्यासाठी रुद्र काळे आणि प्रथमेश भापकर या विद्यार्थ्यांनीही मदत केली. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेचे संस्थापक डॉ. एस.जी. बाहेकर, संदीप बाहेकर, वर्षा शिंदे, सीबीएससीचे मुख्याध्यापक संतोष चाको, विजयकुमार दंदाले, भालचंद्र महाजन, आणि शाळेतील इतर शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आहे. विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या या यशामुळे परतुरचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे.



















