मुदखेड / नांदेड – मुदखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी दि. २१ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५ जणांपैकी एकूण पाच जणांनी माघार घेतली आणि दहा प्रभागातून एकूण ३५ जणांनी माघार घेतल्यामुळे आता एकूण दहा प्रभागातून ८८ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. आनंद देऊळगावकर यांनी पत्रकारांना बोलताना दिली.
नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी एकूण १५ जणांपैकी आज दि.२१ रोजी शिवसेना (उबाठा) पक्षाकडून कल्याणी अविनाश झमकडे यांनी तर अपक्ष असलेल्या अर्चना किरण देशपांडे, जनाबाई गोविदराव नातेवाड, सविता किशोर पारवेकर, बिल्कीस फातेमा अब्दूल सत्तार आज रोजी माघार घेतली आहेत.
एकूण दहा प्रभागातून १२३ उमेदवार रिंगणात होते दि.२१ नोव्हेंबर रोजी ३५ जणांनी प्रामुख्याने अपक्षांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यामुळे निवडणुकीत ८८ उमेदवार राहणार असल्याची माहिती देण्यात आली आणि शहरात एकूण २१,०४९ मतदार असून एकूण २५ मतदान केंद्राची स्थापना करण्याची माहिती यावेळी देण्यात आली याप्रसंगी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार मारोतराव जगताप आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी जगदीश दळवी यावेळी उपस्थित होते.



















