तामसा / नांदेड – अर्धापूर ते तामसा राष्ट्रीय महामार्गावर तामसा नजीक नियोजित टोल नाक्यावर रुद्राणी कन्स्ट्रक्शनच्या हलगर्जीपणामुळे पर्यायी रस्ता न काढता रस्त्यावर टाकण्यात आलेले ‘क्रॅश बॅरियर’ला टक्करून मोटरसायकलचा अपघात झाला. त्यात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला असून रुद्राणी कन्स्ट्रक्शन व प्रोजेक्ट मॅनेजरवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची घटना दि. 21 रोजी शुक्रवारी मध्यरात्री एक वाजतानंतर घडली.
अर्धापूर ते तामसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 (आय) महामार्गावर तामसा नजीक टोलनाका उभारण्याचे काम एक वर्षापासून कासवगतीने सुरु आहे. टोलनाका उभारण्याचे काम सुरु असताना रुद्राणी कन्स्ट्रक्शनकडून कोणत्याही प्रकारचा पर्यायी रस्ता, दिशादर्शक चिन्ह, काम चालू असल्याचे दिशादर्शक बोर्ड, बॅरिकेट्स, बॅनर, रेडियम लावून वाहनचालकांना धोक्याचा इशारा देणाऱ्या कसल्याच निशाण्या, पाट्या लावलेल्या नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्यावरील वाहतुकीत येणारे अडथळे दिसत नसल्याने अपघात घडले आहेत.
दि. 21 रोजी रात्री अंदाजे एक वाजताचे सुमारास घडली आहे. तामसा येथील ‘आंध्रा’ इडली सेंटरचे मालक सतीश सुरेश बारसे (वय 36) राहणार बारसगाव ता. अर्धापूर हे मोटारसायकल क्रमांक एम. एच. – 20 एफ. बी. 8477 वरून गुरुवारी रात्री नांदेडहून हॉटेलचे साहित्य खरेदी करून तामस्याकडे येत होते.
राष्ट्रीय महामार्गावर तामसा नजीक नियोजित टोलनाक्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावरच ठेवण्यात आलेले सिमेंटचे प्लेट ‘क्रॅश बॅरियर’ ठेवलेले त्यांना दिसले नसल्याने त्यावर मोटारसायकल धडकल्याने मोठा अपघात झाला. त्यातच चालक सतीश बारसे यांचा जागीच मृत्यू झाला. तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मयतावर शेवविच्छेदन करुन बारसगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयताचा भाऊ माणिक सुरेश बारसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामसा पोलीस ठाण्यात रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनी छत्रपती संभाजीनगर व कंपनीचे सिनिअर प्रोजेक्ट मॅनेजर धोंडीराम जांभळे यांचे विरुध्द मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बालाजी नरोटे करीत आहेत.



















