सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी शहराच्या विविध 18 भागात आजोरा, दूषित कचरा उचलण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी 11 जेसीबी, 20 डंपर यांच्या मदतीने दिवसभरात एकूण 83 खेपा घेऊन प्रचंड प्रमाणावर आजोरा व दूषित कचरा उचलण्यात आला.
महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी शहराच्या विविध भागात आजोरा, दूषित कचरा उचलण्याची मोहीम राबविण्यात आली. शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने दर शुक्रवारी आजोरा उचलण्याची मोहीम घेण्यात येते. यानुसार शुक्रवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली प्रभावीपणे राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये शहरातील विविध महत्त्वाच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आजोरा उचल, कचरा संकलन व स्वच्छता कामे करण्यात आली. ही मोहीम जुना पुना नाका, शेळगी गावठाण, जिल्हा परिषद परिसर, शेळगी ब्रिज, एकतानगर रोड ते श्रीकृष्ण मंगल कार्यालय,एमआयडीसी रोड, विमानतळ परिसर,म्हाडा कॉलनी,डी-मार्ट रोड ते गोविंदश्री मंगल कार्यालय,सहयोग नगर,नवोदय नगर,मीरा पिठाची गिरणी कंबर तलाव मैदान,वसंत नगर कॉर्नर, रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसर,दमाणी नगर,मरीआई चौक, जेल रोड परिसर,डफरीन हॉस्पिटल,शानदार चौक या भागात राबविण्यात आली. या मोहिमेसाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री व मनुष्यबळ तैनात करण्यात आले. 11 जेसीबी, 20 डंपर यांच्या मदतीने दिवसभरात एकूण 83 खेपा घेऊन प्रचंड प्रमाणावर आजोरा व दूषित कचरा उठाव करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार प्रत्यक्ष उपस्थिती राहून मार्गदर्शन केले. यावेळी सफाई अधिकारी (वाहन) अनिल चराटे, तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक उपस्थित राहून मार्गदर्शन केले.महापालिका प्रशासन शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी कटिबद्ध असून, नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

























