मंगळवेढा – मंगळवेढा पोलीस प्रशासनाने कर्कश आवाज करत जाणार्या 15 मोटर सायकलचे सायलन्सर काढून त्याच्यावर रोडरोलर फिरवून नष्ट केल्याने मोटर सायकलस्वारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यापुढेही कर्कश आवाज करणार्या मोटर सायकलवर कारवाईची मोहिम सुरु राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी सांगीतले.
मंगळवेढा शहरात गेल्या अनेक दिवसापासून बुलेट,यामाह,सुझीकी आदी गाड्यांच्या पुंगळ्या काढून कर्कश आवाज करीत काही तरुण मुले फिरत असल्याने पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईची कठोर भूमिका घेतली आहे. डी.वाय.एस.पी.डॉ.बसवराज शिवपुजे,पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संभाजी यादव,पोलीस अंमलदार मनोज साळुंखे, सुनिल काळेल आदींचे पथक नेमून अशा कर्कश आवाज करत जाणार्या मोटर सायकलवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे.
दरम्यान शनिवारी मंगळवेढा शहरात वाहतूक शाखेच्या पथकाला 15 मोटर सायकली सायलन्सर काढून कर्कश आवाज करीत असताना मिळून आल्या. या सायलन्सरवर पोलीसांनी चक्क रोडरोलर फिरवून त्या नष्ट करण्यात आले. यापुढेही अशीच कारवाई केली जाणार असल्याने मोटर सायकल स्वारांचे धाबे दणाणले आहे. यामध्ये कोणाचीही गय न करता निप:क्षपातीने कारवाई केली जाणार आहे.
मंगळवेढा शहरात 15 मोटर सायकलचे सायलन्सर काढून त्यावर रोडरोलर फिरवताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे,वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संभाजी यादव व अन्य कर्मचारी छायाचित्रात दिसत आहेत. (छाया-शिवाजी पुजारी,मंगळवेढा)



















