पुणे – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात स्थित डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने राज्य हादरले आहे. १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या या गुन्ह्यात गावातील २४ वर्षीय विजय खैरनर याला अटक करण्यात आली आहे.पीडित परिवाराला लवकर न्याय मिळावा, यासाठी या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील त्यांनी रविवारी (ता.२३) केली.
घटनानंतर पीडित कुटुंबाला राज्य सरकारच्या मनोर्धैर्य योजनेतून १० लाखांची मदत देण्यात आली.मात्र, “ही केवळ तत्काळ दिलासा देणारी मदत असून कुटुंबावर झालेली अमानवी हानी कोणत्याही रकमेने भरून निघणार नाही,” असे पाटील म्हणाले.समाजातील अशा प्रवृत्तीला कठोर शिक्षा करून आळा घालण्याची वेळ आली आहे, अन्यथा महिलांच्या व बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच ऐरणीवर राहील; असेही पाटील म्हणाले.
या प्रकरणी न्यायप्रक्रिया वेगाने पार पडण्यासाठी फास्ट-ट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि दोषीला (दोष सिद्ध झाल्यास) लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी पाटील यांनी केली.तसेच, पीडित कुटुंबाच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या हिताविषयी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे आदेश सरकारने तातडीने द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली.२०२२ महाराष्ट्रात ६ हजार ५२० गुन्हे दाखल करण्यात आले.यातील दोषसिद्धी चे प्रमाण केवळ २२ टक्के होते. अशा प्रकरणासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करीत प्रलंबित प्रकरणे आणि दोषसिद्धी चे प्रमाण वाढवावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले.



















