धडगाव – शासकीय माध्यमिक आश्रम शाळा काकरदा येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभाग आयोजित आश्रमिय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी सादर करत काकरदा गावाचा क्रीडाक्षेत्रातील लौकिक अधिक उज्ज्वल केला आहे. कबड्डी, व्हॉलीबॉल तसेच वैयक्तिक खेळ प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करत एकूण चौदा खेळाडू विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवडले गेले असून ही शाळेसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली आहे.
या लक्षणीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्रीम. बी. एल. गावित, अधीक्षक श्री. अशोक पाडवी, अधिक्षिका श्रीम. पायल सावते तसेच सर्व शिक्षकवृंद आणि पालक यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सराव, संघभावना आणि क्रीडा शिस्तीमुळे मिळालेल्या या यशात शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. शैलेंद्र वळवी यांचे प्रभावी मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.
काकरदा येथील सर्व खेळाडूंवर आगामी विभागीय क्रीडा स्पर्धेत आणखी दमदार कामगिरी करण्याची आणि शाळेचे नाव राज्यस्तरावर झळकविण्याची विश्वासपूर्वक अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



















