सोलापूर : रोटरी क्लब सोलापूर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय सोलापूर आणि लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय, मुंबई (बाल शल्यचिकित्सा विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 28 आणि 29 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा रुग्णालय, गुरुनानक चौक, सोलापूर येथे पार पडणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार असून, या वेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, आरोग्याधिकारी, सोलापूर महानगरपालिका डॉ. राखी माने, डॉ. पारस कोठारी (प्रमुख, बाल शल्यचिकित्सा विभाग, लोकमान्य टिळक रुग्णालय, मुंबई), रोटरी जिल्हा 3132 चे प्रांतपाल रोटे. सुधीर लातूरे (2025–26), प्रांतपाल रोटे. जयेश पटेल (2026–27), अध्यक्ष रो. धनश्री केळकर, रोटरी क्लब सोलापूर असे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात नवजात शिशु ते 16 वर्षे वयोगटातील बालरुग्णांच्या खालील शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार आहेत. यामध्ये जीभ टाय, फिमोसिस, हर्निया, अवतरित न झालेला अंडकोष, नाभी हर्निया, सिस्ट / गाठी आदी आजारांवर शास्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत अंगणवाडी व शाळांमधील नियमित आरोग्य तपासणीदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील 240 बालरुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून, त्यांना या विशेष शिबिरासाठी संदर्भित करण्यात आले आहे.


















