वैराग – बार्शी तालुक्यातील शेळगाव ( आर ) येथील शेरखाने वस्तीवर मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. ट्रॅक्टरमध्ये खेळत असताना अचानक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने, अवघ्या ४ वर्षांच्या शिवराज संदीप शेरखाने या निष्पाप बालकाचा दुर्दैवी अंत झाला. या बालकाला वाचवण्यासाठी ग्रामस्थ, प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तब्बल १२ तास अथक संघर्ष केला, परंतु या प्रयत्नांना यश आले नाही. ही घटना शेळगाव आर ते कळमण रस्त्यावरील शेरखानी वस्तीवर घडली.
ही घटना मंगळवारी दुपारी अंदाजे ४:०० वाजता घडली. चार वर्षीय शिवराज संदीप शेरखाने हा ट्रॅक्टरमध्ये खेळत असताना बसून ट्रॅक्टर अचानक चालू झाल्याने अनियंत्रित झाला आणि जवळच्या विहिरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले.
दुपारी ४:३० वाजता सुरू झालेला मुलाला बाहेर काढण्याचा संघर्ष दुसऱ्या दिवशी पहाटे ४:३० वाजेपर्यंत म्हणजे जवळपास १२ तास अविरत चालू होता. बचाव कार्यासाठी संपूर्ण गाव एकवटले होते.

घटनास्थळी बार्शी अग्निशमन दल, १०८ रुग्णवाहिका, वैराग पोलीस स्टेशनचे पथक, आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, गावचे पोलीस पाटील ज्ञानदेव नागणे, ग्रामपंचायत सदस्य विजय अडसूळ व संभाजी गवळी व गावातील सामाजिक राजकीय कार्यकर्ते हे तातडीने दाखल झाले होते. गावातील सामाजिक आणि राजकीय मंडळी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
ही घटना गावातील लोकांना कळताच कांही जणांनी विहिरीतील पाण्याचा अंदाज घेण्यासाठी व बालकाला काढण्याच्या हेतूने पाण्यात उड्या मारल्या परंतू विहीरीची खोली जास्त असल्याने मुलाला वाचविण्यासाठी यश आले नाही त्यानंतर क्रेन बोलावून क्रेनच्या सहाय्याने गळ ( हुका टाकून ट्रॅक्टर आणि मुलाला वर काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, यश न आल्याने विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला.
या कामासाठी ५ ते ६ एचपीच्या पाच ते सात पाण्याच्या मोटर्स कार्यान्वित करण्यात आल्या.१२ तासांचा संघर्षानंतर मोठ्या क्षमतेने पाणी उपसण्याचे काम सुरू होते. रात्री ३ वाजेपर्यंत पाणी पूर्णपणे काढले गेले. अखेरीस, विहिरीच्या सुमारे ५० ते ६० फूट खोल तळाशी पडलेला ट्रॅक्टर आणि बालक शिवराज याचा शोध लागल्यानंतर १२ तासांच्या प्रयत्नांनंतर, पहाटे ४:३० वाजता निष्पाप शिवराजचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यास यश आले.
गेले १२ तास श्वास रोखून सुरू असलेला हा संघर्ष अखेरीस अपयशी ठरल्याने संपूर्ण वस्तीवर आणि शेळगाव परिसरात शोककळा पसरली. या घटनेमुळे शेरखाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावासाठी ही अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे.



















