सोलापूर – श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. सुजाता चौगुले, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संविधान दिनाचे प्रास्ताविक स्वयंसेवक संस्कार ठेले याने मांडले.
विद्यार्थी मनोगता मध्ये योगिता शिंदे, गायत्री कांबळे आणि किरण कुमार हाके यांनी संविधान दिन संकल्पना सविस्तरपणे मांडली. प्राध्यापक मनोगतामध्ये प्रा. अभिजित नारायणकर, प्रा. सुजाता चौगुले आणि प्रा. अजित कुरे यांनी संविधान आणि सद्यस्थितीत अभिप्रेत असणारे विद्यार्थी या विषया बाबत परखड आणि अत्यावश्यक असे विचार मांडले. अध्यक्षीय मनोगता मध्ये प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी विविध उदाहरणाद्वारे बंधुता, सामाजिक एकता, न्याय, वर्तणूक, जबाबदारी, अनुशासन, शिस्त इत्यादी बाबी संविधानाशी कशा प्रकारे निगडित आहेत यावर प्रगल्भ पणे प्रकाश टाकला. विद्यार्थी दशेमध्ये सामाजिक जाणीव ही एक समाज घटक व व्यक्ती म्हणून निरंतर बाळगणे काळाची गरज असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. राष्ट्रहितासाठी आपलेपणाची भावना सबंध जनमानसात टिकवून ठेवण्यासाठी संविधान हे एक वरदान असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचा शेवट हा संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने संपन्न झाला.
याप्रसंगी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची आणि प्राध्यापक वर्गाची उल्लेखनीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वयंसेविका साक्षी काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक संस्कार ठेले याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. संविधान दिन कार्यक्रम आयोजन व संपन्नतेसाठी तृतीय वर्षातील रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. संविधान दिनानिमित्त महाविद्यालयात सकाळ सत्रामध्ये माय भारत पोर्टल वरील प्रश्नमंजुषा आयोजन करण्यात आले होते. यात द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला.



















