अ.नगर – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसाय विस्तारावर भर देणार असून त्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. याच उद्देशाने जिल्हा बँकेतर्फे कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोने तारण कर्जावरील बँकेचा व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत कमी असल्याने, या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे आता सेवकांनी लक्ष्याभिमुख पद्धतीने काम करून या व्यवसायाच्या वाढीस हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.
ते पुढे म्हणाले, “जिल्हा बँकेला समृद्ध असा इतिहास असून ही बँक नेहमीच शेतकरी, ग्राहक आणि सभासदांच्या हिताचे धोरण स्वीकारत आली आहे. बँकेची परंपरा उज्वल असून तिच्या सेवांचा विस्तार आता आधुनिक पद्धतीने करण्याची गरज आहे.”

बँकेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सभागृहात जिल्ह्यातील तालुका विकास अधिकारी आणि शाखांतील सेवकांसाठी सोने तपासणी, मूल्यांकन आणि व्यवसायाशी संबंधित अडचणींवरील प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला. या वेळी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील बोलत होते.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी या प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना म्हटले की, “प्रशिक्षणामुळे बँकेचा सोने तारण व्यवसाय निश्चितपणे वाढेल. सेवकांनी या क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन ग्राहकांना उत्तम सेवा देणे अपेक्षित आहे.”
या प्रसंगी जिल्ह्यातील तालुका विकास अधिकारी आणि सेवकांच्या वतीने चेअरमन पदावर निवड झाल्याबद्दल चंद्रशेखर घुले पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास बँकेचे जनरल मॅनेजर जयंत देशमुख, राजेंद्र शेळके, सुरेश पाटील, संजय बर्डे तसेच मॅनेजर्स आणि सेवकवृंद उपस्थित होते.



















