अ.नगर : सुरक्षित प्रवासासाठी रहदारीच्या नियमांची जनजागृती शासनस्तरावर केली जात आहे. नागरिकांनी स्वयंप्रेरणेने रहदारीचे नियम पाळल्यास अनेक समस्यांना आळा बसेल.
विवाहानंतरच्या पहिल्याच दिवशी निकिता व ओंकार मते या नव दांपत्याने रस्ता सुरक्षा संदर्भातील घोषवाक्य असलेले प्रचार साहित्य उपलब्ध करून दिले. प्रशांत मते परिवाराचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी केले.
येथील रेल्वे स्टेशन मल्हार चौक परिसरातील संजीवनी कॉलनी येथील रहिवासी प्रशांत मते यांचे चिरंजीव ओंकार व अरुण वल्ली यांची कन्या निकिता यांचा विवाह नुकताच संपन्न झाला.
विवाहानंतरच्या पहिल्याच दिवशी आपण समाजाचे काही देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या नवदांपत्याने रस्ता सुरक्षा संदर्भातील घोषवाक्य असलेले प्रचार साहित्य शहर वाहतूक नियंत्रण शाखेला उपलब्ध करून दिले. त्याप्रसंगी बोरसे बोलत होते.
महामार्गावर वेग मर्यादा पाळा! अपघात टाळा!! ,
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा !
अपघातांना बसेल आळा !! ,
वापरा शिरस्त्राण ! वाचतील प्राण !! ,
सीटबेल्टचा वापर नियंत्रित गती ! आपली सुरक्षा आपल्याच हाती!!
ही घोषवाक्य असलेले प्रचार पत्रक यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेत देण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक शमूवेल गायकवाड, मन्सूर सय्यद, सिद्धार्थ धायतडक, स्व. रामलालजी ललवाणी मेमोरियल मेमोरियल फाउंडेशनचे महावीर ललवाणी अभय ललवाणी, प्रशांत मते, ऋषिकेश ललवाणी आदी उपस्थित होते.



















