सोलापूर – रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी, तेजज्ञान फौंडेशन, रापेल्ली परिवार यांचे श्रुती इंजिनिअरिंग, आणि एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे आणि श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयचे प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ली व चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, रोटरी क्लबचे अध्यक्ष रमेश कमटम, सचिव काशिनाथ कुंटला यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी फित कापून व शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उदघाटन केले.
गेल्या १७ वर्षांपासून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ करण्यात येत आहे. यावेळी रोटरीचे भावी प्रांतपाल जयेश पटेल, माजी प्रांतपाल वेंकटेश चन्ना यांनीही भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. या शिबिरात तब्बल 200 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील श्रुती इंजीनियरिंग येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशनचे श्री गणेश ईराबती, बोल्ली ब्लड बँकेचे अशोक इंदापुरे, संजय मडुर, श्रीनिवास रिकमल्ले, रोटरी क्लब सोलापूर एमआयडीसीचे चार्वाक बुर्गल, सत्यनारायण गुर्रम, अंबादास गड्डम, गोपाळ रापेल्ली व कर्मचारी वृंदांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
या रक्तदान शिबिराचे मुख्य संयोजक परशुराम रापेल्ली यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि रक्तदात्यांचे आभार मानले.



















