माहूर / नांदेड – 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिक, पोलीस आणि जवानांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संविधान वाचन ,मेणबत्ती प्रज्वलन कार्यक्रमही घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पोलीस निरीक्षक देविदास चोपडे म्हणाले कि,“ २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वीर जवान आपल्या मायभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देऊन गेले आहेत. हल्ल्याच्या १७ वर्षानंतर सुद्धा त्या घटनेच्या वेदनादायी आठवणी आजही ताज्याच आहेत.शहिदांचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही.” असे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,नगराध्यक्ष फिरोज दोसानी,हाजी कादर दोसानी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर भारतीय संविधान दिनानिमित्त प्रा. विनोद कांबळे यांनी संविधानाचे वाचन केले.
कार्यक्रमास नगरसेवक, नगरसेवक प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार,प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.



















