माहूर / नांदेड – श्रीक्षेत्र माहूर गडावर पुढील महिन्यात ०४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या श्री दत्त जयंती यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने श्री दत्त शिखर संस्थानसह इतर सर्व देवस्थान ठिकाणी देवदर्शनासाठी लाखो भाविकांची उपस्थिती राहणार असल्याने शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने भाविकांच्या सेवा-सुवीधेला प्राधान्य देऊन त्या पुरविण्याकडे लक्ष द्या, अशा स्पष्ट सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांनी दि. २७ नोव्हेंबर रोजी माहूर पंचायत समितीच्या कै.वसंतराव नाईक सभागृहात आयोजित यात्रा पूर्व नियोजन आढावा बैठकीत सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांना केल्या.
धार्मिक परंपरेप्रमाणे दरवर्षी माहूरगडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे भगवान श्री दत्तात्रेय प्रभु यांचा दत्त जन्म सोहळा मोठ्या भक्ती भावाने उत्साहात साजरा करण्यात येतो. या सोहळ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त उपस्थित राहून “देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता ! दत्त नामाचा गजर करत प्रभु श्री दत्तात्रेय यांच्या भक्तिध्ये लीन होतात. तपोभूमी श्री दत्त शिखर संस्थानसह शहरातील महानुभाव पंथाचे मंदिर हे निद्रा स्थान असलेल्या श्री देव देवेश्वर संस्थान येथेही दत्त जन्म सोहळ्यास लाखो भाविकांची उपस्थिती असते. तर श्री आनंद दत्त धाम आश्रम साईनाथ महाराजांच्या मठातही लाखावर भाविक दत्त नाम जपण्याकरता सतत सात दिवस मुक्कामी राहतात.
त्यामुळे गडावर येणाऱ्या लाखो भाविकांना कुठलीही असुविधा जाणवू नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांनी माहूर तालुका प्रशासनाच्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावून श्री दत्त जयंती यात्रा महोत्सव नियोजनाच्या पूर्व तयारीविषयी महत्वाची बैठक घेतली. परंतु या बैठकीला काही विभाग प्रमुखांनी दांडी मारत आपले प्रतिनिधी पाठवत अपुरी माहिती सादर केल्याने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
या बैठकीत नायब तहसीलदार कैलास जेठे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, नायब तहसीलदार अरुणा सूर्यवंशी यांचेसह सहा.गटविकास अधिकारी पी.डी.मुरादे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.डी. माचेवार, मराविमंचे अभियंता आर. बी. शेंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.डी. आंबेकर, आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड, राष्ट्रीय महामार्गाचे क.अभियंता ए.जी. हजारे,क.अभियंता पी. एल.कांबळे,क.अभियंता पी. व्ही. हंचाटे,श्री दत्त शिखर संस्थानचे व्यवस्थापक जी.एन. नाईक, पोका. गजानन जाधव, नगरपंचायतचे सहा.कार्यालय अधीक्षक एस.एस.गजलवाड, विजय शिंदे,मंडळाधिकारी चंदनकर, व्ही आर चिभडे आगारप्रमुख, पं.स. चे एम.एम.लोणीकर, तलाठी सी. पी.बाबर, देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त एस.एल. कोथळकर,
वनरक्षक एन.बी. दुर्गे, श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे यांचे सह पत्रकार उपस्थित होते.



















