सोलापूर – शहर जिल्ह्याचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून म्हणावा तसा झाला नाही. यापुढील शहराचा विकास आराखडा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर असेल, त्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. मात्र आता सोलापूरचे रूप पालटण्यासाठी “मी इथे आलो आहे. कारण सोलापूर हे माझे आजोळ आणि जन्मस्थळ आहे. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी माझा एक प्रकारे वेगळा जिव्हाळा आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली आहे.”
त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत राहील. तर काही जागेवर स्वबळावर लढणार असल्याचा निर्वाळा सत्तेतील सहभागी मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा सोलापूर शहर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
पुढे ते म्हणाले, राज्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहे. शिवाय पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरातील सर्व २६ प्रभागात १०२ जागा लढवून किमान ७५ जागा जिंकून सत्तेत येईल, यापूर्वी सोलापूर महापालिकेवर काँग्रेसची त्यानंतर भाजपची सत्ता होती. या काळात सोलापूरचा विकास म्हणावा तशा प्रगतीने झाला नाही. यापुढे सोलापूर शहराचा विकास हाच आमचा ध्यास असणार आहे. त्यासाठी सोलापूर शहराच्या विकास आराखड्यासंबंधी काम चालू आहे. लवकरच तो प्रसिद्ध करणार आहोत. नव्वदीच्या काळामध्ये सोलापूरच्या प्रत्येक भागात एक दिवसाआड पाणी येत होते. आता बिकट अवस्था तीन झाली आहे. असे प्रश्न विचारले असता, त्यांनी विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांवर याचे खापर फोडले. तत्पूर्वी तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे जंगी स्वागत जुने पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, सुधीर खरटमल, महिला अध्यक्षा संगीता जोगदंडकर, चित्रा कदम, माजी नगरसेवक गणेश पुजारी, प्रदेश सचिव प्रमोद भोसले, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराच्या संपूर्ण २६ प्रभागात संकल्प यात्रा पोहोचणार
तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यात प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता आणि मतदार यांच्याशी संपर्क साधून अडीअडचणी जाणून घेणार आहोत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शहरातील संपूर्ण २६ प्रभागात पोहोचण्याचा संकल्प या यात्रेनिमित्त केला असल्याचे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
बी.एल. ओ.मार्फत मतदार यादीचे काम होणे गरजेचे
मतदार यादीत झालेला मतदारांचा घोळ लक्षात घेता, कार्यकर्त्यांनी निवडणूक लागण्यापूर्वीपासूनच मतदार यादीचे काम करणे गरजेचे आहे. बी.एल. ओ.मार्फत मतदार यादीचे काम होणे गरजेचे आहे. तरच त्यामध्ये सत्यता टिकून राहते. आता सध्या राज्यात मतदार यादीचा घोळ कायम आहे. असेही अण्णा बनसोडे म्हणाले.
एम.आय.एमचे उर्वरित नगरसेवक देखील राष्ट्रवादीत दाखल होणार
गत महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने सोलापूर महापालिकेत नऊ जागा जिंकत एक वेगळे अस्तित्व निर्माण केले. परंतु पाच वर्षात एम.आय.एम.पक्षातील ६ माजी नगरसेवक एम.आय.एम. पक्ष सोडून आमच्या पक्षात दाखल झाले असून, उर्वरित नगरसेवक देखील आमच्या राष्ट्रवादीत लवकरच दाखल होतील असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला.



















