टेंभुर्णी – महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी येथे आज 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय संविधान दिन उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रॅली, प्रश्नमंजुषा, हस्तकला स्पर्धा, सेल्फी पॉईंट अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी विद्यार्थ्यांनी संविधान जनजागृतीसाठी गावातून भव्य रॅली काढली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली फलकं, घोषणाबाजी आणि संविधानाविषयी माहितीपर संदेश यामुळे रॅलीने पालकांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण टेंभुर्णी परिसरातून संविधान दिनानिमित्त रॅली काढणारी महात्मा फुले विद्यालय ही एकमेव शाळा ठरली, यामुळे पालकवर्गाकडून विशेष प्रशंसा व्यक्त झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी मनोगते व्यक्त करत लोकशाही मूल्यांचे महत्त्व उलगडून सांगितले. शाळेचे संस्थापक नारायण भानवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संविधानाचे महत्व आणि नागरिक म्हणून आपली कर्तव्ये अधोरेखित केली. कार्यक्रमास मुख्याध्यापक शोयब बागवान, कॉर्डिनेटर माऊली पवार, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे उत्तमरीत्या सूत्रसंचालन श्रीमती सुषमा कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन शितल लोखंडे यांनी मानले. विविध उपक्रमांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संविधान दिनाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.



















