फुलवळ / नांदेड – कंधार तालुक्यातील हाडोळी ते लातूर सीमेला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्याची अवैध वाळू वाहतुकीमुळे दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (सा.बा.वि.), कंधार यांनी हा रस्ता चांगल्या दर्जाचा केला होता, मात्र आता तो पूर्णपणे उखडून गेला आहे
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातून लातूरकडे होणारी अवैध वाळूची वाहतूक या रस्त्यावरून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात सुरू असते. क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरलेल्या जड वाहनांची (टिप्पर/हायवा) सततची ये-जा या रस्त्यासाठी घातक ठरली आहे.
परिणामी, काही महिन्यांपूर्वी झालेला हा रस्ता पूर्णपणे तुटला असून, सर्वत्र खड्डे पडले आहेत. या दुर्दशेमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने या अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई करावी आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.



















