सांगोला – अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील दिया या गावचे चंदुलाल मुनशी मावसकर व त्यांचे नातेवाईक ऊस तोडणी साठी सांगोला तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून फिरत आहेत. वाढेगाव मेडशिंगी रस्त्यावर ऐवळे यांच्या शेताजवळ त्यांचा सध्या मुक्काम आहे.
शुक्रवारी दुपारी ऊस तोडणीसाठी गेल्यानंतर राहत असलेल्या पालाला / झोपडीला आग लागून संपूर्ण झोपडी भस्मसात झाली. झोपडीत असलेले अन्नधान्य, कपडे, अंथरून, पांघरून जळाल्यामुळे मोठे नुकसान झाले.
या घटनेची माहिती प्रा.सहदेव ऐवळे यांनी सांगोल्यातील आपुलकी प्रतिष्ठानला दिल्यानंतर प्रतिष्ठानने त्यांना तातडीची मदत म्हणून ब्लॅंकेट, बेडशीट व किराणा माल देऊन मदत केली. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, कैलास कांबळे, दत्तात्रय नवले, अमर कुलकर्णी आदींसह ऊसतोड मजूर उपस्थित होते.
यावेळी हायकोर्टाचे ऍड.बी.आर.माने म्हणाले, कसलाही संबंध नसताना केवळ आपुलकीच्या भावनेतून जळीतग्रस्तांना अगदी वेळेत योग्य ती मदत केली आहे. खऱ्या अर्थाने माणुसकी जोपासण्याचे काम आपुलकी प्रतिष्ठान करत आहे. त्यामुळे मन भरून आल्याशिवाय राहत नाही. प्रा.सहदेव ऐवळे यांनीही आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.


























