सोलापूर : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियम समोरील रस्त्याच्या कडेला असलेले बस स्टॉप हटविण्यात आले. अचानक हे बस स्टॉप गायब झाल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
सोलापूर शहरात वर्दळीचे ठिकाण असलेल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियम समोरील रस्त्याच्या कडेला गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या स्थितीत मोठे बस स्टॉप होते. हे बस स्टॉप गायब झाले असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या बस स्टॉपच्या मागे एका नव्या शोरूमचा शुभारंभ होत आहे. कदाचित त्यामुळेच हे बस स्टॉप हटविण्यात आल्याची उलट – सुलट चर्चा नागरिकांमधून होत आहे.
अचानक हे बस स्टॉप दिसेनासे झाल्यामुळे येथील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे महापालिका परिवहन उपक्रमाची गती मंदावली आहे. शहरात अनेक ठिकाणी महापालिका परिवहन बस स्टॉपची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळते. अशातच पार्क स्टेडियम समोरील हे बस स्टॉप काढण्यात आल्याने नागरिकांमधून महापालिकेच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी सोशल मीडियावर महापालिकेचे बस स्टॉप गायब झाल्याचे नमूद करत महापालिका प्रशासनाचे खोचकपणे अभिनंदन केले आहे.
परवानगी घेऊनच काढले, लवकरच नवे बस स्टॉप उभारणार : तपन डंके
दरम्यान, महापालिका परिवहन उपक्रमाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले, पार्क स्टेडियम समोरील रस्त्यावरील त्या बस स्टॉपच्या मागे एक नवे शोरूम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका परिवहन उपक्रमाकडून रीतसर परवानगी घेऊन ते बस स्टॉप काढले आहे. त्या बदल्यात उद्घाटनानंतर लवकरच नवे चांगल्या पद्धतीचे बस स्टॉप शोरूम धारकाकडून उभारण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेला कोणताही खर्च होणार नाही. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी माहिती महापालिका परिवहन उपक्रमाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी दिली.

























