बार्शी – जिजाऊ गुरुकुल, खांडवीतर्फे आयोजित करण्यात आलेला दिल्ली शैक्षणिक अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला आहे. विद्यार्थ्यांना भारताची संस्कृती, इतिहास आणि प्रशासन यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. गावाबाहेर कधीही न गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच देशाची राजधानी पाहण्याचा अनोखा आनंद अनुभवला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबरच प्रत्यक्ष जगाचा अनुभव मिळणे अत्यंत आवश्यक आहे. दिल्लीसारख्या ऐतिहासिक व प्रशासनिक राजधानीचे दर्शन विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला नवी दिशा देणारे ठरते. अशा सहली विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि राष्ट्रीय भावना दृढ करतात.
८ दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी इंडिया गेट, राजघाट, जंतर मंतर, राष्ट्रपती भवन, संसद भवन, कुतुब मिनार, लोटस टेंपल, अक्षरधाम मंदिर तसेच लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी स्मृती संग्रहालये अशा महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली. इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आणि भारतीय विज्ञान-प्रशासनाचा जवळून अभ्यास करत विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि ज्ञान दोन्हीही वाढले.
या दौऱ्यातील सर्वात प्रेरणादायी क्षण ठरला वाघा बॉर्डर येथील भव्य परेडचा अनुभव. भारतीय सैनिकांची ताठ मानेची चाल, देशभक्तीची धगधगती भावना आणि सीमारेषेवरील शिस्तबद्ध समारंभ पाहून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची जाज्वल्य भावना निर्माण झाली. अनेक विद्यार्थ्यांनी देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनातील सुरक्षा यंत्रणा, तंत्रज्ञानयुक्त हॉल्स, पुरस्कार वितरण स्थळे आणि प्रशासनिक व्यवस्था प्रत्यक्ष पाहून भविष्यातील ध्येय निर्धारणाला नवी दिशा मिळाल्याचे सांगितले. दिल्लीचे वास्तव रुप पुस्तकात आणि नकाशांतून पाहिलेला इतिहास प्रत्यक्ष अनुभवताना विद्यार्थ्यांना अपार आनंद झाला.
डायरेक्टर संदेश कदम यांनी सांगितले की, हा प्रवास फक्त सहल नव्हे तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा एक समृद्ध अध्याय आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने इतिहास, भूगोल, प्रशासन आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत प्रत्यक्ष शिक्षण घेतले. या अनुभवातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सहकार्यभाव आणि शिस्त निश्चितच वाढेल. वाघा बॉर्डरवरील परेड पाहताना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली देशभक्तीची ज्वाला अमूल्य आहे. राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि विविध राष्ट्रीय संग्रहालयांना भेट देताना विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक दृष्टीकोनालाही नवी दिशा मिळाली. भविष्यात एखाद्या मोठ्या पदावर जाण्याचे, देशासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
सदर शैक्षणिक दौऱ्याचे संपूर्ण नियोजन सचिवा सौ. वर्षा घाडगे, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम आणि नियोजन व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली जे. बी. शिंदे, शिवराज चौगुले आणि भैरू जाधव यांनी उत्कृष्टरीत्या केले.
जिजाऊ गुरुकुल, खांडवीचे व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि पालक यांच्या सहकार्यामुळे हा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पार पडला.
या दौऱ्याने विद्यार्थ्यांच्या मनात भारताबद्दल अभिमान आणि भविष्याची स्वप्ने जागवली असून हा अनुभव त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक आयुष्यात नक्कीच मोलाचा ठरेल.

























