सोलापूर : जबाबदारी आणि कर्तव्यदक्षपणे प्रशासकीय तसेच वैद्यकीय सेवा बजावावी लागते. शिस्त आणि संयमाने मोठी उंची गाठता येते. वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना कोरे यांनी त्यांच्या सेवाकाळात चांगली जबाबदारी पार पाडली. रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा दिली, असे गौरवोद्गार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले.
महापालिका आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना कोरे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल आयएमए हॉल येथे महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अरुंधती हराळकर , पिरिपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे, डॉ. सुरेश कोरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने म्हणाल्या, सोलापूर महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच महापालिकेच्या विविध दवाखाना आणि प्रसूतीगृहात चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत. चांगले डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफमुळे चांगले उपचार केले जात आहेत. डॉ. ज्योत्स्ना कोरे यांनी आपल्या सेवा काळात जबाबदारी आणि तळमळीने चांगली वैद्यकीय सेवा बजावली आहे. यावेळी डॉ. हराळकर, राजाभाऊ इंगळे, डॉ. मृणाल खंदारे, डॉ. वैशाली शिरशेट्टी, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, इकबाल तडकल यांच्यासह मान्यवरांनी डॉ. कोरे यांच्या कार्याचा गुणगौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. सुरेश कोरे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. एम. डी. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बाबरे यांनी आभार मानले. यावेळी महापालिका कर्मचारी – अधिकारी यांच्यासह कोरे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

























