गंगापूर / संभाजीनगर – २ डिसेंबर रोजी होणाऱ्या गंगापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने भव्य आणि काटेकोर तयारी पूर्ण केली आहे. शहरातील १६ इमारतींमध्ये ३३ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, एकूण २९,२८७ मतदार यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १४,८८४ पुरुष, १४,३९७ महिला आणि ६ इतर मतदारांचा समावेश आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी आणि १ शिपाई अशी नियुक्ती करण्यात आली असून, एकूण १३२ नियमित तसेच ४० राखीव कर्मचारी मिळून १७२ कर्मचारी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणार आहेत.
मतदानासाठी प्रत्येक बूथवर १ कंट्रोल युनिट आणि २ बॅलेट युनिट देण्यात आले आहेत. ३३ केंद्रांसाठी ३३ कंट्रोल युनिट आणि ६६ बॅलेट युनिट तर अतिरिक्त वापरासाठी १० कंट्रोल युनिट आणि २० बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात आले आहेत.
निवडणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी दोन स्थिर पथके आणि चार भरारी पथके तैनात आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य सुपूर्द करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आणि अतिरिक्त सहाय्यक अधिकारी यांच्या उपस्थितीत कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. साहित्य वाहतुकीसाठी प्रशासनाने १० खासगी जीप उपलब्ध केल्या आहेत.
बंदोबस्तासाठी पोलीस दलाची मोठी फौज तैनात
मतदान सुरळीत व सुरक्षित राहावे यासाठी पोलीस दलाकडून मजबूत बंदोबस्त करण्यात आला आहे. यात ९ दुय्यम पोलिस निरीक्षक, ७७ पोलीस कर्मचारी, ५० होमगार्ड व १६ सीएपीएम जवानांचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांनी दिली.
गंगापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रशासनाची ही व्यापक आणि काटेकोर तयारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सक्षम, पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पाडण्यास निश्चितच मोलाची ठरणार आहे, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


























