वसमत / हिंगोली – नव्या बसस्थानकाच्या कामात सुरू असलेली गोंधळाची मालिका आता सरळसरळ धक्कादायक वळणावर पोहोचली आहे. रात्रीच्या अंधारात कॉलम भरणे, तेही व्हायब्रेटर न वापरता, हा प्रकार समोर येताच एसटी महामंडळाचे अभियंता श्री. सरोदे यांनी थेट स्पष्ट केले
“काँक्रीटची गुणवत्ता टिकवायची असेल तर व्हायब्रेटर अनिवार्य आहे. ज्या कॉलममध्ये वापर झाला नाही, त्यांची तपासणी होईल आणि गरज पडल्यास पाडण्याचे आदेशही दिले जातील.”
संबंधित वृत्तपत्राने विचारले
“रात्री काम करण्यास महामंडळाची शासकीय परवानगी होती का?”
त्यावर सरोदे यांनी कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. ना हो म्हणाले… ना नाही! या गूढ शांततेने संपूर्ण कामावर काळ्या सावलीसारखी शंका निर्माण केली आहे.
दरम्यान, सरकारी कागदोपत्री मुख्य गुत्तेदार म्हणून A.R. Construction दिसतो, पण प्रत्यक्ष काम पोटगुत्तेदाराच्या हातावरून चालले आहे.
म्हणजे जवाबदारी कुणाची, काम कुणाकडे, आणि नियंत्रण कुणाचे? याबाबत पूर्ण गोंधळ आहे.
जागेवर अभियंता अनुपस्थित, मुख्य गुत्तेदार गायब, व्हायब्रेटर नाही, रात्री कामासाठी परवानगी अस्पष्ट, तर बसस्थानकाचे बांधकाम कोणाच्या भरोशावर उभे राहणार आहे?
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार 1 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता पाहणी केली असता काम बंद होते, तरी रात्री काम सुरू दिवसा उजेडात काम न करता रात्री का काम करतात? कोणाच्या आदेशाने? कशासाठी? ह्या प्रश्नांची अद्याप स्पष्टता नाही.या सर्व कारणांमुळे बसस्थानकाच्या कामाची गुणवत्ता, सुरक्षा आणि पारदर्शकता गंभीर संकटात आली आहे.
नागरिकांनी तातडीने चौकशी करावी, जबाबदारांना ठोस कारवाईला सामोरे जावे, आणि गुणवत्तेची काटेकोर पडताळणी करावी अशी जोरदार मागणी केली आहे.


























