धाराशिव – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ७१ वे राष्ट्रीय अधिवेशन उत्तराखंडमधील देहरादून येथे उत्साहात संपन्न झाले. देशभरातून हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभलेल्या या अधिवेशनात संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील असे विविध ठराव मंजूर केले गेले.याच अधिवेशनात डॉ. प्रितिश रामदास नाईकनवरे यांची अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात आली. ढोराळा (जिल्हा धाराशिव) येथील रहिवासी असलेले डॉ. प्रितिश नाईकनवरे सध्या इंटर्न MBBS डॉक्टर म्हणून कार्यरत असून 2020 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सक्रियपणे जोडलेले आहेत. ते मागील 4 वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजसाठी अभाविप च्या माध्यमातून विविध आरोग्य शिबीर आयोजित करत आहेत.विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक उत्तरदायित्व रुजविण्याचे कार्य करण्यात येते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) अध्यक्ष मा. एस. सोमनाथ यांच्या हस्ते झाले. तसेच अभाविपचे पूर्व कार्यकर्ते आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री मा. पुष्कर सिंह धामी यांनीही अधिवेशनाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले.
देहरादूनमध्ये झालेल्या या अधिवेशनातून संघटनेच्या भावी कार्ययोजनांना नवी दिशा मिळाली असून नव्या नेतृत्वाच्या रुपात डॉ. प्रितिश नाईकनवरे यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


























