जालना – मौजे जालना येथील वक्फ संस्था दर्गाह हजरत जानुउल्लाशाह (रह.) यांच्या मालकीच्या नगर भूमापन (CTS) क्रमांक 6860 व 6861 या मिळकतींवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे, अनाधिकृत होर्डिंग्ज आणि लहान व्यापाऱ्यांकडून अवैध वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप दोन अर्जदारांनी केला आहे. या संदर्भातील निवेदन दर्गाह व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना सादर करण्यात आले आहे.
अर्जदार सय्यद शाकेर सय्यद महेमुद आणि तौसीफ अहमद सुलतान अहमद फारुकी यांनी निवेदनात म्हटले आहे की, जुन्या लोखंडी पुलाजवळील वक्फ मालमत्तेवर काही गुंठेवाटप करणाऱ्या व्यक्तींनी R.C.C. बांधकाम उभारून बेकायदेशीर शादीखाना चालवला आहे. या ठिकाणाहून दरवर्षी अंदाजे १० ते १२ लाखांचे उत्पन्न घेतले जाते; मात्र वक्फ संस्थेला एकही रुपया मिळत नाही. यामुळे दर्गाह व संबंधित मस्जिदींचे आर्थिक नुकसान होत असून, इमाम व मुअज्जिन यांना मासिक मानधन देणेही कठीण झाल्याचे अर्जदारांनी म्हटले आहे.
गरिबशाह कब्रस्तान परिसरातही बेकायदेशीर होर्डिंग्ज लावून दरवर्षी २ ते ३ लाखांपर्यंत उत्पन्न केले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही जागा वक्फ मालकीची असून अशा प्रकारची कमाई पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. कब्रस्तानलगत सुमारे 20 ते 22 ढेला, कपडे व पादत्राणांचे लहान व्यावसायिक रोजीरोटी चालवितात. मात्र काही जणांकडून या छोट्या विक्रेत्यांकडून दररोज 4000 ते 4500 रुपये हप्ता म्हणून उकळला जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गरिब कुटुंबांवर आर्थिक अन्याय होत असून शहर विकासात अडथळा निर्माण होत असल्याचा दावा निवेदनात आहे. वक्फ सर्व्हे नं. 232 मधील मोहम्मदीया मस्जिदीतून काही व्यक्ती महिन्याकाठी अंदाजे 70 ते 75 हजार रुपये घेत असल्याचा आणि त्याचा कोणताही हिशेब नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे वक्फ संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. वरील सर्व अनियमितता त्वरित थांबवून वक्फ मालमत्ता मुक्त करण्याची मागणी अर्जदारांनी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. निवेदनावर सय्यद शाकेर सय्यद महेमुद, तौसीफ अहमद सुलतान अहमद फारुकी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

























