लातूर : गीता जयंतीच्या निमित्ताने भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या लातूर, उदगीर, अंबाजोगाई, माजलगाव, बीड व पैठण येथील शैक्षणिक संकुलातील सुमारे १८००० विद्यार्थ्यांनी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजेच गीता जयंतीच्या दिवशी गीतेच्या १२ व्या व १५ व्या अध्यायाचे पठण केले. या सहाही संकुलातील विद्यार्थी थेट प्रक्षेपणाद्वारे आभासी पद्धतीने जोडले गेले व सकाळी आठ वाजता एकत्रितपणे गीतेच्या १२ व्या व १५ व्या अध्यायाचे पठण केले गेले. यावेळी लातूर येथील श्री केशवराज शैक्षणिक संकुलातील रेनीसन्स सीबीएसई स्कूलमध्ये गीता जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास आभासी पद्धतीने विशेष उपस्थित असलेले गीता धर्ममंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंदजी दातार तसेच मंचावर उपस्थित शारदा पीठाधीशांच्या हस्ते सन्मानपत्र व रोख रक्कम २१००० या स्वरूपाचे पारितोषिक प्राप्त तथा गीतेचे १८ अध्याय मुखोद्गत असलेल्या विशेष अतिथी सौ. कांचन भावठाणकर व सौ. सुवर्णा देशमुख, गीता पठण संस्था समन्वयक तथा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण सरदेशमुख, सहसमन्वयक संजय गुरव, केंद्रीय विद्यासभा संयोजक महेश कस्तुरे, केशवराज शैक्षणिक संकुलाच्या स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष धनंजय तुंगीकर, कार्यवाह शैलेश कुलकर्णी, केशवराज माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष गंगाधर खेडकर, रेनीसन्स सीबीएसई स्कूल शालेय समितीचे अध्यक्ष मनोज शिरूरे, केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव हेंडगे, रेनीसन्स सीबीएसई स्कूलचे प्राचार्य महेश बांगर यांची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण, श्रीमद्भगवद्गीता व भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रवीण सरदेशमुख यांनी आपल्या जीवनातील गीतेचे महत्व सांगितले. गीतेमध्ये रथी व महारथीमध्ये दीर्घकालीन संवाद झाला. यात अर्जुनाची २७ नावे आलेली आहेत तर २३ वेळेस श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धात तयार राहण्यासाठी आवाहन केले आहे. गीतेत अर्जुनाला संबोधल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी दीर्घकाळ कष्ट करावेत, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील विकल्प कमी करावे म्हणजेच संकल्प पूर्ण करता येईल असे सांगितले. याप्रसंगी त्यांनी थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम व स्वामी शिवानंद यांची कथा सांगून भगवद्गीतेचे आपल्या जीवनातील महत्त्व स्पष्ट केले.
याप्रसंगी आभासी पद्धतीने गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष मुकुंदजी दातार यांनी आपल्या आशीर्वाचनात गीताधर्म मंडळाची स्थापना सांगून मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा गीता जयंतीचा दिवस निश्चित करण्याचे कार्य गीता धर्ममंडळांने केले असे सांगितले. याच दिवशी ४९५६ वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता आजही या वायुमंडलात अस्तित्वात आहे, जी पुढच्या काही वर्षात एआयच्या मदतीने आपणास साक्षात भगवंताचे शब्द ऐकता येतील असे सांगितले. गीतेचा १२ वा अध्याय म्हणजे साधन आहे, जो ज्ञानी भक्त होण्यास सांगतो आणि १५ वा अध्याय साध्य आहे, जो भगवंतासारखे पुरुषोत्तम होण्यास सांगतो. गीतेत सांगितलेले तत्त्वज्ञान सर्वांनी अंगीकारावे असे सांगून त्यांनी सर्वांना गीता जयंतीच्या शुभेच्छा व शुभाशीर्वचन दिले.
अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गीतेतील १८ अध्याय मुखोद्गत असलेल्या विशेष अतिथी सौ. कांचन भावठाणकर व सौ. सुवर्णा देशमुख यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यानंतर १२ व्या व १५ व्या अध्यायाचे पठण कांचन तोडकर, शैला कुलकर्णी व श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील सुरज बजाज यांनी केले. मंचावर उपस्थित मान्यवरांचा परिचय व स्वागत गीता पठण संस्था सहसमन्वयक संजय गुरव यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता मेहकरकर व वैशाली फुलसे यांनी केले तर आभार केंद्रीय विद्यासभा संयोजक महेश कस्तुरे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता संतोष बीडकर यांच्या संपूर्ण वंदे मातरम् ने झाली. या कार्यक्रमासाठी आभासी पद्धतीने विविध संस्कार केंद्रातील एकूण अठरा हजार विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, स्थानिकचे पदाधिकारी, मान्यवर पाहुणे यांची उपस्थिती होती.
यावेळी केशवराज शैक्षणिक संकुलातील श्री केशवराज प्राथमिक विद्यालय, श्री केशवराज माध्यमिक विद्यालय, रेनीसन्स सीबीएसई स्कूलमधील सर्व विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गीता पठण संस्था समन्वयक प्रवीण सरदेशमुख, सहसमन्वयक संजय गुरव, संस्था पदाधिकारी, केशवराज संकुलातील सर्व संस्कारकेंद्र प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

























