सोलापूर – दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी जागतिक दिव्यांग दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016(RPWD Act 2016) अंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना(दिव्यांग) शाळेच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे, कोणताही भेदभाव न करता गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, समान संधी, समान वागणूक याकरिता समावेशित शिक्षणास प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. समावेशित शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमता, शिकण्याची शैली तसेच त्याची शारीरिक मानसिक व भावनिक गरज लक्षात घेऊन नियमित शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांसोबत अध्ययन अध्यापन करण्यात येते.
या बालकांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये तसेच अभ्यासक्रमात अनुकूलित बदल करून शिक्षण पूर्ण केले जाते. मूल हे अनुकरणाने शिकत असते करिता समावेशित शिक्षणामध्ये अशा बालकांना विविध प्रकारचे अध्ययन अनुभव देणे सोयीस्कर होते. अशा विशेष गरजाधारक बालकांसोबत शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना, भावनिक विकास होण्यास मदत होते.
सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सन 2025- 26 मध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील एकूण 1876 विशेष गरजाधारक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्रत्येकाच्या शैक्षणिक, शारीरिक, मानसिक व भावनिक गरजा भिन्न आहेत. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार एकूण 21 दिव्यांगत्वाचे प्रकार आहेत.
समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण ही केंद्रशासन पुरस्कृत योजना असून, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांना शाळेत टिकवून गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्याच्या अनुषंगाने खालील प्रमाणे शैक्षणिक व सहाय्यभूत सुविधा दिल्या जातात.
१. मदतनीस भत्ता -विशेष गरजा असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना हलन चलनास समस्या (अंध व सोमवारी खालील दोन्ही अंग निकामी असणारी)येतात तसेच इतरांच्या मदतीशिवाय शाळेत येऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी मदत करणाऱ्या मदतनिसास प्रतिमाह रुपये ६०० प्रमाणे एका शैक्षणिक वर्षासाठी मदतनीस भत्ता देण्यात येतो.
2. प्रवास भत्ता -घरापासून शाळेचे अंतर दूर असल्यास व थेरपीआवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांना थेरेपी घेण्यासाठी tyeraphy सेंटरमध्ये ये- जा करण्याकरिता प्रतिमाह ६०० रुपये प्रमाणे स्वागत करण्यात येतो.
3. प्रोत्साहन भत्ता-विशेष गरजाधारक मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढावे यासाठी त्यांना प्रतिमाह रुपये २०० प्रमाणे वसाहन भत्ता देण्यात येतो.
4. वाचक भत्ता -अंध विद्यार्थ्यांना वाचनासाठी मदत करणाऱ्या सहाय्यकास प्रतिमाह रुपये दोनशे प्रमाणे वाचक भत्ता दिला जातो.
5. लेखनिक भत्ता -अंध अथवा हात किंवा हाताची बोटे नसलेल्या विद्यार्थ्यांना लेखनास मदत करणाऱ्या सहाय्यकास प्रतिमाह रुपये २०० प्रमाणे लेखनिक भत्ता दिला जातो.
6. साहित्य साधने व उपकरणे – या विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार ज्या साहित्य साधनांची गरज आहे अशी साहित्य साधने समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत मोफत दिली जातात. जसे तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, सुगम्य केन ,रोलेटर, कुबड्या, C.P.chair,TLM Kit, श्रवणयंत्र, स्मार्टफोन, ब्रेल किट, कॅलिपर्स इत्यादी सन २०२४- २५ व २०२५- २६मध्ये एकूण २४५ विद्यार्थ्यांना साहित्य साधने व उपकरणे वाटप करण्यात आले आहेत.
7. काळजीवाहक – ज्या शाळांमध्ये ३ ते ४ किंवा त्यापेक्षा अधिक अतितीव्र स्वरूपातील दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा शाळांमध्ये काळजीवाहकाची सुविधा पुरविण्यात येते.
8. थेरेपी सेवा – ज्या विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना तज्ञा मार्फत फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, मानसशास्त्रीय मूल्यमापन अशा संदर्भीय सेवांसाठी शिफारस केलेले आहे. अशा बालकांना सर्वसमावेशक संसाधन व प्रशिक्षण केंद्र, महानगरपालिका मराठी मुलांची केंद्र शाळा क्रमांक ०६, जोड बसवण्णा चौक सोलापूर येथे मोफत थेरेपी सेवा पुरविण्यात येते.
9. विशेष शिक्षक – ज्या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षकांची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षित विशेष शिक्षक यांचे अध्ययन अध्यापन सहाय्य देण्यात येते.
10. वैद्यकीय मूल्यमापन शिबिरे – उन्हाळी सुट्टीतील सर्वेक्षणामध्ये विशेष शिक्षकांनामार्फत विशेष गरजाधारक बालकांचा शोध घेण्यात येतो. शोध घेतलेल्या बालकांचे वैद्यकीय तज्ञांमार्फत औपचारिक व कार्यात्मक मूल्यमापन करण्यात येते. अशा शिरांमध्ये विद्यार्थ्यांच्या गरजांची निश्चिती करून आवश्यकतेनुसार सहाय्यभूत सेवा सुविधा देण्यात येतात.
11. UDID कार्ड व दिव्यांगत्व प्रमाणपत्र-समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना (दिव्यांग) यु डी आय डी कार्ड व दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यात येते. सदर उपक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण ३२१ विद्यार्थ्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र व यु डी आयडी कार्ड प्राप्त करून देण्यात आले.
नियमित शाळेत शिकणाऱ्या ० ते १८ वर्षे वयोगटातील विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांना त्यांची अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी, दिव्यांगत्व त्याच्या शिक्षणामध्ये अडथळा होऊ नये, यासाठी समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण या योजनेअंतर्गत वरील सर्व लाभ देण्यात येतात. दिव्यांगत्वाला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने लवकर निदान व उपचार दिले जातात. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याचे दिव्यांगत्व त्याच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक व भावनिक विकासामध्ये अडथळा ठरू नये यासाठी शीघ्रहस्तक्षेप करण्यात येतो. अशी बालके नियमित शाळेत शिकल्यामुळे त्यांच्या विकासास चालना मिळते तसेच पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये असणारी न्यूनगंडाची भावना गळून पडते. अशा बालकांना नियमित शाळेत प्रवेश देत असताना पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते अशावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन देखील करण्यात येते.०३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांना समाजामध्ये एक उत्पादनशील घटक तसेच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहानुभूती ऐवजी समाजाने कोणताही भेदभाव न करता समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
*************************
विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नजीकच्या नियमित शाळेत प्रवेश घ्यावा. शिक्षण हक्क कायद्यान्वये अशा विद्यार्थ्यांना नियमित शाळेत प्रवेश देणे बंधनकारक आहे. जर प्रवेशास कुणीही अडथळा निर्माण करत असेल तर या कार्यालयास संपर्क साधावा.
श्री मल्हारी माने,
प्रशासन अधिकारी, महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग ,सोलापूर
**************-*-*-
दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार समावेशित शिक्षणास प्रोत्साहन देण्यात आलेले असून, दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील गुणवत्ता पूर्ण शिक्षण, समान संधी याचा हक्क आहे. नियमित शाळांमध्ये अशा बालकांसाठी अडथळा विरहित वातावरण, भौतिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार व गरजेप्रमाणे अनुकूलित अध्ययन अध्यापन करण्यात येते.
श्री अविनाश शिंदे, समन्वयक, समावेशित शिक्षण महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग, सोलापूर.


























