माढा – आर्या कृषी महाविद्यालयात स्थापन केलेल्या ग्लोबल लर्निंग व इंटरॅक्शन फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची अनोखी संधी उपलब्ध होत आहे. या उपक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांना जागतिक ज्ञानाशी जोडणे, विविध देशांतील प्रगत कृषी पद्धतींची ओळख करून देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानविषयक दृष्टी विस्तार करणे हा आहे. या मालिकेतील पुढील टप्प्यात २९ नोव्हेंबर २०२५ रोजी बेलीन, जर्मनी येथील सुप्रसिद्ध डेअरी उद्योगपती श्री. पीट रीटसेमा आणि त्यांची पत्नी श्रीमती हेलन वर्मीज यांनी आर्या कृषी महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला. सदर उपक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे मार्गदर्शक मा. रणजितसिंह शिंदे तसेच महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रणिता शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले
महाविद्यालयीन परिसरात आगमन होताच पाहुण्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम, प्रयोगशाळा सुविधा, विद्यार्थी सादर करीत असलेले प्रात्यक्षिक प्रकल्प आणि परिसरातील स्थानिक शेतीपद्धतींचा बारकाईने आढावा घेतला. भारतीय कृषी शिक्षणातील सकारात्मक बदल आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष चर्चासत्रात श्री. रीटसेमा यांनी आपल्या उद्योगाच्या प्रवासाची गोष्ट सांगत दोन हजार गाईंच्या क्षमतेच्या अत्याधुनिक डेअरी फार्मचे व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा वापर आणि जागतिक डेअरी उद्योगातील नवे कल याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेली संयमी व सखोल उत्तरे विशेष लक्षवेधी ठरली.
श्रीमती हेलन वर्मीज यांनीही उद्योजकता, उच्च शिक्षणातील जागतिक संधी आणि परदेशातील प्रशिक्षणाचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “भारतीय तरुणांमध्ये अपार ऊर्जा व क्षमता आहे— त्यांना जागतिक अनुभवाची जोड मिळाल्यास ते मोठी झेप घेऊ शकतात,” असे त्या म्हणाल्या.
या भेटीचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी ग्लोबल ऍग्रीनेक्ससचे रोहित चकोर आणि सचिन दळवे यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना जागतिक बाजारपेठ व तांत्रिक प्रगतीची ओळख करून देण्यास अशा उपक्रमांचे मोलाचे योगदान असते. विद्यार्थ्यांच्या जागतिक दृष्टिकोनात भर घालणारी ही भेट त्यांच्या करिअर विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरल्याचे प्राचार्य डॉ. नितीन उबाळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रभावी समन्वयक म्हणून डॉ. तृप्ती राठोड आणि प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी प्रा. संदीप मुरुमकर, प्रा. खंडेराव वाघे, प्रा. तुषार नामदे, प्रा. ज्ञानेश्वरी झोळ, प्रा. अमोल माळी, डॉ. संदीप मखमले, प्रा. अक्षय शेळके, रोहित घळके आणि कुमार शिंदे आदी उपस्थित होते.
पाहुण्यांनी आर्या कृषी महाविद्यालयाच्या मानेगाव येथील विद्यार्थी आदित्य साळुंखे यांच्या शेताला भेट देऊन द्राक्ष, पेरू, डाळिंब व कांदा पिकांची माहिती घेतली. साळुंखे कुटुंबीयांसोबत त्यांनी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. तसेच बबनरावजी शिंदे साखर कारखाना, तुर्क पिंपरी येथेही त्यांनी भेट देऊन उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. या दरम्यान कारखान्याचे जी.एम. कैलास मते, गणेश चव्हाण, शंकर तसिलदार, राहुल पाटील व शशिकांत घाडगे उपस्थित होते.

























