सोलापूर – महाराष्ट्र राज्य गांधी फोरमच्या अध्यक्षपदी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र राष्ट्रीय गांधी फोरमचे प्रभारी अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम बलदवा यांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय गृहमंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आज जनवात्सल्य येथील निवासस्थानी देण्यात आले.
यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, गांधी फोरमचे सचिव नंदकुमार यल्ला,डॉ. मंगेश शहा, हॉकीपट्टू जहांगीर शेख, माजी रणजी क्रिकेटपटू बाळ दळवी, उद्योगपती राजकुमार राठी,चंद्रकांत कोंडगुळे, उपेंद्र ठाक्कर, कृष्णदेव वाघमोडे,प्रा.बोळकोटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते,
यावेळी बोलताना गांधी फोरमचे राष्ट्रीय प्रभारी अध्यक्ष पुरुषोत्तम बलदवा म्हणाले की गांधी फोरम ही संघटना स्थापन होऊन पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. माजी राष्ट्रपती स्वर्गीय आर. वेंकटरमण यांनी गांधी फोरम संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेमध्ये कर्नाटकचे माजी मंत्री स्वर्गीय निजली आप्पा, माजी केंद्रीय नियोजन मंत्री एम. व्हि.राजशेखरन, यांनी काम केलेले आहे.जेष्ठ स्वतंत्र सेनानी स्वर्गीय तुळशीदास जाधव हे या गांधी फोरम संघटनेचे महाराष्ट्राचे प्रमुख होते.
त्यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा पुरुषोत्तम बलदवा यांच्याकडे आली. गांधी फोरमचे काम गेल्या पंचवीस वर्षापासून सोलापूर जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रमध्ये सुरू आहे. ही संघटना केंद्रस्तरावरील असून या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक,शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. संघटनेचे हे रौप्य महोत्सव आहे.
या वर्षांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार वितरण, महात्मा गांधीच्या जयंती निमित्त व्याख्यानमाला, महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरित झालेल्या व्यक्तीला गुजरात व वर्धा व साबरमती आश्रमाला भेटी देणे व महात्मा गांधी यांच्या कार्याची माहिती अनुभवणे पंचवीस वर्षांच्या कार्याचा अनुभव देणारी स्मरणिका काढणे आणि या स्पर्धेचे प्रकाशन देशाचे सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ,माजी केंद्रीय गृहमंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे,काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यावर्षी राबविण्यात येणार असून आणि या सर्व कार्यक्रमची धुरा सातलिंग शटगार सर शिवाय दुसरे कोणी चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व असून कोणत्याही गोष्टी मनापासून काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. असे ते म्हणाले.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की श्री सातलिंग शटगार हे वर्षभर चांगले कार्यक्रम राबवतील याची खात्री मला असून महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित असलेल्या माहितीचे एक मोठे प्रदर्शन सोलापुरात व्हावे आणि महात्मा गांधीजीचे तत्व प्रणाली नुसार त्यांच्या विचाराचे प्रचार आणि प्रसार संपूर्ण देशभर करण्याचा मानस त्यांनी त्यावेळी व्यक्त केले.महात्मा गांधी एक विचार आहे. आणि ते विचार कधीही संपत नाही असे ते म्हणाले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा.सातलिंग शटगार म्हणाले की सुशीलकुमार शिंदे साहेब हे माझे दैवत आहेत.त्यानी व पुरुषोत्तम बलदवा यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. या पदास न्याय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वादाची गरज आहे. असे ते म्हणाले.
रौप्य महोत्सवाचा पहिला कार्यक्रम राज्यस्तरीय पुरस्कार वितरण डिसेंबर महिन्यात सुरुवातीस होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.
यावेळी गांधी फोरमचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























