नरसी – गोविंद नरसीकर
नायगाव तालुक्यात अवैध दारूविक्री शिगेला पोहोचली असून नियंत्रणाची जबाबदारी असलेला उत्पादन शुल्क विभागाचीच मुक संमती असल्याचे धक्कादायक चित्र उघड झाले आहे. गावोगावी किराणा दुकान, पानटपऱ्या, हॉटेलं, तसेच काही घरांतही देशी–विदेशी दारू सहज उपलब्ध होत असल्याने तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे मोठे प्रमाण वाढत आहे.
या अवैध दारू विक्रेत्यांकडून दरमहा ठरल्या प्रमाणे वसूली करणा-या कर्मचाऱ्यांना संबंधित उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची मुक संमती आहे का? असे पालक व महिलावर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून ‘‘विभाग नेमका कोणाला संरक्षण देतो?’’ असा खडा सवाल उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील परिस्थिती बेकाबू होण्यामागे उत्पादन शुल्क विभागातील काही कर्मचाऱ्यांचा थेट हात असल्याच्या उघड चर्चा सुरू आहेत. दरमहा ‘ठरल्याप्रमाणे’ वसुली करून उच्चपदस्थांपर्यंत पैसा पोहोचवला जातो, त्यामुळे अवैध धंद्याविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. काही ठिकाणी दारूविक्री थेट अधिकाऱ्यांच्या माहितीमध्ये असूनही कारवाई होताना दिसत नाही, हे अधिकच संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



















