बिलोली – सैनिकस्कूल सोसायटी, संरक्षण मंत्रालय (भारत सरकार,नवी दिल्ली) व सगरोळी (ता.बिलोली) येथील राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय यांच्यात नवीन सैनिक स्कूल स्थापन करण्याबाबतचा नुकताच महत्वपूर्ण करार झाला असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय दर्जाचे सैनिकी शिक्षण सगरोळी येथे उपलब्ध होणार आहे. या केंद्रीय सैनिक स्कूलमध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी माध्यमाची इयत्ता ६ वी वर्गाची तुकडी सुरू होणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.
विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय पातळीवरील सुविधांचा लाभ मिळणार आहे. नव्याने सुरू होणारे सैनिकी विद्यालयातील वर्ग हे पुढील शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होतील, अशी माहिती सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य गिरीश आलुरकर यांनी दिली. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी संधींचे नवे दार खुले झाले आहेत. प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येणार आहे. परीक्षा साधारण जानेवारी महिन्यात होईल. परीक्षेचे सूचनापत्र, जाहिरात, माहिती सार्वजनिक करण्यात येणार आहे.
पुढील शैक्षणिक वर्षामध्ये केवळ इयत्ता ६ वीचा वर्ग सुरु होणार असून त्यात मुले व मुली असे ऐकून ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ६० टक्के स्थानिक म्हणजे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य तर उर्वरित विद्यार्थी हे संपूर्ण भारतातून प्रवेश घेतील. उच्च दर्जाचे सैनिकी प्रशिक्षण, सोयी-सुविधा व गुणवत्ता इत्यादींचा लाभ मिळणार असल्याने भरतीय सैन्य दलामध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ठरणार आहे. येथील सैनीकि विद्यालयाच्या प्रयत्नांना यश आल्याने स्थानिक पातळीवर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
“मागील २९ वर्षांपासून राज्यशासनाच्या सहकार्याने येथे सैनिकी विद्यालय सुरु आहे. या प्रशालेतील अनेक विद्यार्थी देशांच्या संरक्षण क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावीत आहेत. केंद्रीय स्कूलच्या स्थापनेमुळे शाळा थेट संरक्षण मंत्रालयाशी जोडली जाईल. त्यामुळे उच्च पातळीवरील मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल.”
रोहित देशमुख, संचालक, संस्कृति संवर्धन मंडळ. सगरोळी.

























