सोलापूर : महापालिका कामगार कल्याण जनसंपर्क व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांसाठी फिजिओथेरपी शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात फिजिओथेरपिस्ट तसेच ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी व आवश्यक उपचार करण्यात आले.दिव्यांग व दिव्यांंग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
जागतिक दिव्यांग दिन निमित्त आज दिव्यांग बांधवांसाठी सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या संकल्पनेतून कामगार कल्याण दिव्यांग विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे यांचे नेतृत्वाखाली महापालिका भौतिकोपचार केंद्र जोडबसवण्णा चौक, मनपा शाळा क्रं ६, सुधीर गॅस एजन्सीमागे, सोलापूर या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत फिजिओथेरपी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने , शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरूंधती हराळकर , मनपा भौतिक आरोग्य केंद्र फिजिओथेरपिस्ट डॉ. आदित्य झिपरे , ऑक्युपेशनल थेरपीस्ट डॉ. प्रवीण राठोड , कामगार कल्याणचे शिवराम मोटे , संजीव शिंदे, रेहमान पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये विविध प्रकारचे व्यायाम, सांधेदुखी व स्नायूंच्या तक्रारींसाठी उपचार, चालण्यास व हालचालीस मदत करणाऱ्या तंत्रांची माहिती तसेच पुनर्वसनविषयक मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी दिव्यांगांसाठी व दिव्यांंग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक व्हीलचेअर, श्रवणयंत्रे, काठी, वॉकर, ब्रेसेस इत्यादी साहित्य मोफत वितरण करण्यात आले. लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांचे पुनर्वसन, आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढण्यास मदत होते. पुढील काळातही अशा शिबिरांचे सातत्य राखण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. विशेष शिक्षक समन्वयक अविनाश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
भविष्यातही नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार : खानसोळे
यावेळी कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे म्हणाले, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी कामगार कल्याण – दिव्याग विभाग मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम योजना राबविण्यात येतात व भविष्यातही असेच नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील.

























