जालना :- महाराष्ट्र गोसेवा आयोगाने राज्यातील देशी गोवंशाचे संरक्षण, संवर्धन आणि कल्याण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नोंदणीकृत गोशाळा आणि शुद्ध गोवंश प्रक्षेत्रांना ‘श्रेष्ठ राजदूत’ (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून सन्मानित करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एकूण दोन संस्थेची या सन्मानासाठी निवड केली जाणार असून, त्यांना ‘गोसेवा आयोग पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. तरी पात्र नोंदणीकृत गोशाळा, गोसदन आणि पांजरपोळ संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र गोसेवा आयोगाने केले आहे.
निवडीसाठी संस्थांनी गोवंश संवर्धन, गोमय (गोबर) आणि गोमूत्र आधारित उत्पादनांचे मूल्यवर्धन, गो-आधारित प्राकृतिक (सेंद्रिय) शेती, गोशाळा व्यवस्थापन, गो पर्यटन, गोसंवर्धन केंद्राचे व्यवस्थापन आणि सामाजिक सहभाग अशा दहा ‘गो-धोरणांवर’ प्रभावीपणे काम केलेले असणे आदि निकष लावण्यात आले आहेत. आयोगाच्या नियमावलीनुसार, केवळ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांनाच सन्मानित करून त्यांना ‘आत्मनिर्भर गोशाळा’ बनविण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
यासाठी जिल्हास्तरीय पडताळणी समिती अहवाल सादर करेल. सर्व पात्र नोंदणीकृत गोशाळा, गोसदन आणि पांजरपोळ संस्थांनी या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या संबंधित जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. असे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

























