धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत बालाजी अमाईन्सपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर तुळजापूर–सोलापूर महामार्गावर दि.३ डिसेंबर रोजी पहाटे भीषण अपघात झाला.पहाटे अंदाजे १.३० वाजता MH 12 XT 1753 सुझूकी स्विफ्ट या वाहनाचा टोलगेटपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या लोखंडी खांबाला जोरदार धडक बसली. धडकेचा आवाज दूरपर्यंत घुमला आणि पाहता पाहता भीषण स्थिती निर्माण झाली.
या अपघातात सुधाकर विलास गिरे आणि भारत शंकर विटकर (दोन्ही रा. मार्डी, जि. सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश तानाजी गरड व विजय नागेश मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण मार्डी गावचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघातानंतर तामलवाडी टोलनाका येथील ॲम्बुलन्सने तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असून पुढील तपास तामलवाडी पोलीस करीत आहेत. घटनास्थळी काही काळ वाहतूक मंदावली होती. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


























