जेऊर – सध्या ऑरगॅनिक शेती, रेसिड्यू फ्री शेती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती असे शब्द वारंवार आपल्या कानावरती पडत असतात, परंतु ही शेती प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण करायला जातो त्यावेळेस त्याला असंख्य अडचणी येतात.विषमुक्त शेती करण्यासाठी आवश्यक असलेल्या निविष्ठा आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने अनेक शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरावी लागतात.
शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीने ही अडचण लक्षात घेऊन 2 वर्षापासून करमाळा शहरांमध्ये ऑरगॅनिक शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये चिकट सापळे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे याबरोबरच 10 ड्रम ची औषधे, बीज प्रक्रियेसाठी लागणारी औषधे, हुमणी वरती प्रभावी असलेले परभणी विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स, गांडूळ बेड, गांडूळ कल्चर हे सर्व उपलब्ध करून दिले आहे याचा परिणाम म्हणून करमाळा तालुक्यामध्ये विषमुक्त शेतीची चळवळ जोमाने कार्य करत आहे .
शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या या कामाची दखल वावर या कंपनीने घेतली असून त्यांनी राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीला सोलापूर जिल्ह्याचे वितरक म्हणून मान्यता दिली आहे. सोलापूर कार्यक्षेत्र मध्ये काम करण्याची संधी आता कंपनीला मिळाली आहेत त्यामुळे करमाळा तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना अतिशय माफक दरामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन साठी लागणारे निविष्ठा आता सहजासहजी उपलब्ध होणार आहेत .त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे .
जिल्हा वितरक म्हणून मान्यता मिळाल्यामुळे करमाळा येथील ऍग्रो मॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सदर कार्यक्रमासाठी कृषी विभाग आत्माचे अजयकुमार बागल, वावर कंपनीचे संचालक संजय शिरोडकर, सीनियर सेल्स लीडर प्रीती आव्हाड, फिल्ड सेल्स एक्झिक्यूटिव्ह प्रदीप बिराजदार, कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर, संचालक अजित काटुळे, संतोष पवार, अलका नलवडे यांच्यासह विषमुक्त शेतीच्या गट चळवळीतील विजय अवताडे, जीवन होगले,हर्षद शिंदे, विक्रम खरात आदी उपस्थित होते.

























