सोलापूर — मध्य रेल्वेने दौंड–कलबुर्गी विशेष अनारक्षित गाडीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली असून, या निर्णयाचे सोलापूर स्थानकावर प्रवासी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हार घालून स्वागत केले. बुधवारी सकाळी गाडी तसेच चालक व अधिकाऱ्यांचा पुष्पहारांनी सत्कार करत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्टेशनवरील वातावरण पाहून आज ट्रेनलाच ‘उत्सव मोड’ लागला होता.
प्रवाशांची वाढती मागणी, दैनंदिन प्रवासाचे प्रमाण आणि नियमित पाठपुरावा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ही मुदतवाढ जाहीर केली. संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की, शेतकरी, विद्यार्थी, महिला, रुग्ण तसेच दररोजचे पासधारक प्रवासी या गाडीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. “ही सेवा अत्यावश्यक बनली असून पुढे ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
गाडी क्रमांक 01421/01422 — दौंड–कलबुर्गी विशेष; गुरुवार व रविवार वगळता आठवड्यातून पाच दिवस धावणार; सेवा २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार. गाडी क्रमांक 01425/01426 — ही अनारक्षित सेवा गुरुवार आणि रविवारी धावणारी; सेवा २६ फेब्रुवारीपर्यंत. रेल्वे प्रशासनानुसार या दोन्ही गाड्यांच्या वेळा, रचना आणि थांबे यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दौंड–कलबुर्गी शटलचे मुख्य लोको पायलट एस. के. रजाक आणि सहाय्यक लोको पायलट मंगेश मोरे यांचा सत्कार प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील तसेच रेल्वे पासधारक विभाग प्रमुख नंदू दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रवासी सेवा संघाचे संजय पाटील,नंदकुमार दळवी,संगीता भोसले,शिवकुमार दरेकरआनंद धोत्रे,विजय माळवे,शिवाजी वस्पटे,विलास राठोड,गणपत पवार,प्रसाद वठारे यांच्यासह कार्यक्रमात राहुल नवले,भारत खारे,दीपक ढवान,हनुमंत शिंदे,अनिल काळे, सुरेश पाटील, सुनील जगताप पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























