माहूर / नांदेड – माहूर येथे सुरू असलेल्या दत्त जयंती यात्रेनिमित्त माहूर नगर पंचायतच्या वतीने पार्किंग, पाणीपुरवठा तसेच स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे. भाविकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून तेथून सातत्याने सूचना व माहिती देण्यात येत आहे.
आज दत्त जयंतीचा प्रमुख दिवस असल्याने शहरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मुख्याधिकारी विवेक कांदे, कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड, लेखापाल विशाल मरेवाड व अभियंता विशाल ढोरे यांनी विविध वाहनतळांची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला.या वेळी नगरसेवक इरफान सय्यद, रफीक सौदागर, विजय शिंदे, धनंजय कळस्कर, सुरेंद्र पांडे, बसवंत पाटील, नय्युम शेख व पंकज लोंढे उपस्थित होते.
दिनांक ३० नोव्हेंबर पासून माहूर गडावरील दत्तशिखर संस्थान येथे पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला असून मंगळवारपासून भाविक मोठ्या संख्येने माहूर शहरात दाखल होत आहेत.
आज या यात्रोत्सवाचा मुख्य दिवस असल्याने भाविकांची मोठी गर्दी माहूरगडासह शहरात उसळल्याच्यापार्श्वभूमीवर स्वच्छता व्यवस्था, पाण्याची सोय, पार्किंग नियोजन तसेच येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी नियंत्रण कक्षातून सातत्याने सूचना देण्यात येत असल्याचे नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले.या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी नगराध्यक्ष फिरोज दोसानी आणि मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी करून समाधान व्यक्त केले.


























